Air India Plane Crash : विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं... कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही : अमित शाह
Air India Plane Crash : एअर इंडियाच्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी या घटनेनं संपूर्ण देश स्तब्ध आहे, असं म्हटलं. संपूर्ण देश एकसाथ आणि संवेदनांसह दुर्भाग्यपूर्ण दुर्घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. अमित शाह म्हणाले की, भारत सरकार, गुजरात सरकार, भारताचे पंतप्रधान यांच्यावतीनं ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो.
बचावलेल्या प्रवाशाला भेटलो : अमित शाह
अमित शाह म्हणाले, अपघातानंतर 10 मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली. तातडीनं मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डयण मंंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन लगेच आला होता, असं अमित शाह यांनी सांगितलं. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृत पणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शाह यांनी दिली.
कुणालाही वाचवण्याची संधीचं मिळाली नाही
घटनेनंतर तातडीनं गुजरात सरकारनं आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केलं. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेड, पोलीस विभाग असो भारत सरकारच्या सीएपीएफला संपर्क करुन सर्वांनी एकत्र मिळून मदत कार्य आणि बचाव कार्य केलं. सव्वा लाख लिटर इंधन विमानात होतं. तापमान इतकं वाढलं की कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळावर जाऊन आलो आहे, असंही अमित शाह यांनी सांगितलं.
सर्व प्रवाशांच्या मृतदेहाला बाहेर काढण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ज्या प्रवाशांचे नातेवाईक इथं पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेण्याचं काम दोन तीन तासात पूर्ण होईल. विदेशात ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती देण्याचं काम झालं आहे. ते जेव्हा पोहोचतील तेव्हा डीएनए घेतले जातील, असं अमित शाह म्हणाले.
जितके मृतदेह मिळाले आहेत, त्यांचे डीएनए नमुने घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. गुजरातमध्ये 1000 डीएनए टेस्ट कराव्या लागतील. याची सुविधा गुजरातमध्ये आहे. त्यासाठी दुसऱ्या राज्यात जावं लागणार नाही. एफएसएल आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ दोन्ही संस्था कमी वेळात डीएनए परिक्षण पूर्ण करतील. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना दिले जातील. नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था इतर व्यवस्था योग्यपणे करण्यात आली आहे. आढावा बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली आहे, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
नागरी उड्डयण विभागानं चौकशी सुरु केली आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी योग्यप्रकारे चौकशी व्हावी, अशा सूचना केल्या आहेत, असं अमित शाह म्हणाले. हा अपघात आहे, अपघाताल कोणी रोखू शकत नाही. परंतु 365 दिवस 24 तास अशा प्रकारच्या घटनांवेळी प्रशासनाच्या तत्परतेची कसोटी होते. गुजरातच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्परतेची कसोटी दुर्भाग्यपूर्ण स्थितीत झाली ते सर्वांसमोर आलं, असं अमित शाह म्हणाले.
























