विमान दुर्घटनेत कॅप्टन सुमितसह 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्सचा मृत्यू; अपर्णा महाडिक तटकरेंच्या नातेवाईक
12 क्रू मेंबर्ससह 242 प्रवाशांना घेऊ उड्डाण केलेले एअर इंडियाचं विमान कोसळलं असून दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. सुदैवाने विमानातील 11 अ या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याची माहिती आहे.

मुंबई : गुजरातमधील विमान दुर्घटनेत (Ahmedabad plane crash) 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एका प्रवाशाचं नशिब बलवत्तर म्हणून तो बचावला. सध्या जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअर इंडियाची फ्लाईट एआय -171 ने अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ते दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात विमानातील (Airplane) 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 क्रू मेंबर्संनाही आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 चार क्रू मेबर्सं होते, विशेष म्हणजे कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल यांच्यासह आणखी 3 क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातील रहिवाशी होते. त्यामध्ये, सुमित पुष्काराज आणि अर्पण महाडिक हे दोघे मुंबईतील (Mumbai) रहिवाशी आहेत. तर, दीपक पाठक हे बदलापूरचे आणि रोशनी सोनघरे ह्या डोंबिवलीकर आहेत. या दुर्घटनेत 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्संचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुबीयांवर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
12 क्रू मेंबर्ससह 242 प्रवाशांना घेऊ उड्डाण केलेले एअर इंडियाचं विमान कोसळलं असून दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. सुदैवाने विमानातील 11 अ या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिली आहे. या प्रवाशाचं नाव विश्वशकुमार रमेश असं आहे, त्याचा रुग्णवाहिकेकडे जात असतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, या दुर्घटनेत इतर सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला असून जिथं विमान आदळलं तेथील अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लंडनकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या या विमानात महाराष्ट्रातीलही अनेक प्रवासी होते. त्यामध्ये, मूळचे सांगोला तालुक्यातील हातीद महादेव तुकाराम पवार (वय वर्ष 67) आणि त्यांच्या पत्नी अशा महादेव पवार (वय 55) या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यासह, 4 क्रू मेबर्सं हे महाराष्ट्रातीलच होते.
बदलापूरचे दिपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती बदलापुरात त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्र परिवाराला कळताच पाठक यांच्या घरी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे आज दुपारी विमानात जाण्यापूर्वीच त्याचं आईशी फोनवरून बोलणं झालं होतं. त्यानंतर दीपकशी काही संवाद झालेला नाही. मात्र, आता दीपकचा फोन लागतो, पण तो उचलत नाही, अशी मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीने दिली. दीपकचे 4 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.
डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे हिचा मृत्यू
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रहिवाशी कु. रोशनी सोनघरे हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती.
पवईचे सुमित सभ्रवाल
अहमदाबाद दुर्घटनेतील पायलट सुमित सभ्रवाल हे पवईच्या जलवायू विहार इमारतीमध्ये त्यांच्या वडिलांसह राहतात. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच येथील स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले.
अपर्ण महाडिक सुनिल तटकरेंच्या नातवाईक
क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या, अमोल देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. सुनील तटकरे गोरेगावमध्ये अमोल महाडिक यांच्या घरी दाखल झाले आहेत. तर, मंत्री योगेश कदम यांच्याच सोसायटीत राहत होत्या. अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांची नातेवाईक होत्या. महाडिक हे सुनील तटकरे साहेबांचे नातेवाईक आहेत, त्यांचे आमच्यासोबत सुद्धा चांगले संबंध आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखद आहे. महाडिक कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, महाडिक कुटुंबियांना आम्ही भेट देणार असल्याचेही मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं.
सांगोल्यातील दोघांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले महादेव तुकाराम पवार (वय वर्ष 67) आणि त्यांच्या पत्नी अशा महादेव पवार (वय 55) हे दोघे पती पत्नी सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करत असल्याने ते सध्या अहमदाबाद येथे स्थायिक झाले आहेत. येथील कापड मिल नडीयाद येथे ते काम करत होते, सध्या निवृत्त झाले होते. आपल्या लंडनच्या मुलाला भेटण्यासाठी हे दोघे लंडनला चालले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. विशेष म्हणजे,मागच्या पंधरा दिवसांमध्ये हे दोघे हातीद या त्यांच्या मूळ गावी भावांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ एक मुलगी दोन मुले आहेत.

























