संदिपान भुमरेंना 15 टक्के द्यावे लागते, सोसायटीच्या चेअरमनने अब्दुल सत्तारांसमोरच केली 'पोलखोल'
Sandipan Bhumre : प्रचार सभा सुरु असतांना या सभेतच पालकमंत्री संदिपान भुमरे यांना 15 टक्के द्यावे लागतात असा गंभीर आरोप सोसायटीच्या चेअरमनने केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : चक्क एका मंत्र्यासमोरच दुसरा मंत्री टक्केवारी घेत असल्याचा आरोप करण्यात आल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) पाहायला मिळाला. जिल्ह्यात मजूर सहकारी सोसायटीच्या निवडणुका सुरू आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा आरोप करण्यात आला आहे. प्रचार सभा सुरु असतांना या सभेतच पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना 15 टक्के द्यावे लागतात असा गंभीर आरोप सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. विशेष म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे व्यासपीठावर असतांना त्यांच्यासमोरच हे आरोप करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या निवडणुक सुरू आहे. याच निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे मजूर सहकारी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जात आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मजूर सहकारी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ खुलताबाद येथील श्री. भद्रा मारोती संस्थान येथे नारळ फोडून तसेच येथील जर जरी बक्ष दर्गा येथे चादर चढवून करण्यात आला. यानंतर येथील म्हैसमाळ रोडवरील ए वन लॉन्स येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी बोलतांना सोसायटीच्या एका चेअरमनने मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
भुमरेंवर कोणते आरोप करण्यात आले?
यावेळी बोलतांना चेअरमन म्हणाले की,“विकास कामं फक्त मोठमोठ्या लोकांना मिळते. आमच्या सारख्या गरिबांना काहीच मिळत नाही. आमच्या हातात एकही काम आले नाही. आम्ही सर्व चेअरमन फक्त नालावाच चेअरमन आहोत. आमची परिस्थिती खूप गंभीर आहे. अब्दुल सत्तार येथे असल्याने त्यांना सांगणे गरजेचे आहे. आम्ही त्यांना सांगणार नाही तर कोणाला सांगणार आहोत. आमच्या तालुक्याचे जेवढे गोरगरीब चेअरमन आहेत, ते कुठे गेले तर त्यांना इकडून तिकडे पळवले जाते. आमच्या तालुक्याचे आमदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे गेलो तर त्यांना 15 टक्के द्यावे लागते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती आहे," असं आपल्या भाषणात बोलतांना एक चेअरमन म्हणाले.
नेत्यांची भाषणं...
दरम्यान, यावेळी सभेत नेत्यांची भाषणं देखील झाली. "मजूर सहकारी विकास पॅनल हे सर्व पक्षीय पॅनल असून पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे अवाहन यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले. तर मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, मजूर सहकारी विकास पॅनलचे उमेदवार हे संचालक पदाची उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडतील. संस्थेच्या हितासाठी मजूर सहकारी विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदारांचा कौल हा मजूर सहकार पॅनलच्या बाजूने असल्याचे,” पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
'बापाच्या जहागीरमुळे आज तिथे बसलात'; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका