(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'बापाच्या जहागीरमुळे आज तिथे बसलात'; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका
Sanjay Shirsat : मोदींना वाकून नमस्कार करणारे उद्धव ठाकरे आज त्यांच्या घरंदाजीवर बोलतायत: शिरसाट
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : प्रत्येकवेळी बाप, जहागीर काढतात. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोणते खड्डे खोदले. तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात. कशासाठी कुणाचा बाप काढता. असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरे काही नाही. असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांना शोभत नाही आणि नागरिक येणाऱ्या काळात याचे उत्तर उद्धव ठाकरेंना देतील, या भाषेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी बोलणं योग्य नाही. संजय राऊत बोलले तर समजू शकतो. मोदींना वाकून नमस्कार करणारे तुम्हीच, आज तुम्ही त्यांच्या घरंदाजीवर बोलतायत. त्यांनी जर आपलं घराणं काढलं तर, त्यामुळे ज्या मोदींनी देशाच्या स्वाभिमानाचा झेंडा जगात लावला त्यांच्यावर अशा टीका करणे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. संजय राऊत जशी बडबड करतात, त्यांचं कोणी मनावर घेत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी असं बोलू नये असा माझा स्पष्ट त्यांना सल्ला आहे, असं शिरसाट म्हणाले.
मिलिंद देवरांनी आमच्यासोबत यावं...
मिलिंद देवरा यांच्या घराण्याला एक वारसा आहे. काँग्रेसमध्ये संपूर्ण हयात काढल्यानंतर देखील त्यांच्या कामाचा कुठेही गौरव होत नाही. या पिढीतील ते चांगले नेते आहेत. ते आमच्या पक्षात येण्याच्या तयारीत असल्याचं देखील मला कळालं आहे. त्यामुळे मिलिंद देवरा जर आमच्यासोबत आले तर आमची नक्कीच ताकद वाढणार आहे आणि आम्हाला देखील आंनद होईल. आम्ही देखील त्यांना आवाहन करतो, तुम्ही आमच्यासोबत या खांद्याला खांदा लावून आपण मुंबईचा विकास करू असे शिरसाट म्हणाले.
शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश...
राज्यात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. कालपर्यंत जे निकालाची वाट पाहत होते, ज्यांना वाटत होतं की निकाल आपल्याच बाजूने लागेल. काही महाभाग तर सरकार पडणार, नवीन मुख्यमंत्री येणार सांगत होते. आता त्यांचे तोंड बंद झाले आहेत. या निकालानंतर ज्यांना आमच्याकडे यायचं होतं त्यांच्यासाठी दरवाजे उघडले आहे. त्यामुळे लवकरच ते शिवसेनेत येतील. 30 जानेवारीपर्यंत सर्व पक्षप्रवेश होतील, असे शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: