(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या 'हिंदू जनगर्जना मोर्चा'ला पोलिसांनी परवानगी नाकारली
Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे परवानगी नाकारली असल्याने मोर्चा काढू नयेत अशा सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) नामांतराच्या समर्थनात आज निघणाऱ्या मोर्चाची पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही मोर्चा निघणारच असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे. सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने आज 'हिंदू जन गर्जना' मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी कालपासूनच जोरदार तयारी करण्यात येत आहे. ज्या क्रांती चौकातून मोर्चा निघणार आहे, त्याठिकाणी होर्डिंग देखील लावण्यात आले आहे. तर पोलिसांकडून देखील याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, परवानगी नाकारली असल्याने मोर्चा काढू नयेत अशा सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज (19 मार्च) रोजी सकाळी 10 वाजता हिंदू जनगर्जना मोर्चा सभा आयोजित केली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी त्यांना परवानगी नाकारली आहे. उपायुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते यांच्या सहीने तसेच पत्र आयोजक भाग्यतुषार जोशी यांना देण्यात आले. ज्यात आज निघणाऱ्या मोर्च्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र असे असलं तरीही आयोजकांनी मोर्चा काढण्याची भूमिका कायम ठेवली आहे.
असा होणार मोर्चा?
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज (19 मार्च) रोजी क्रांती चौक येथून पैठणगेट, टिळकपथ मार्गे महात्मा ज्योतीबा फुले चौकापर्यंत मोर्चा व तेथे सभा आयोजित केली होती. या मोर्चा व सभेला शिवेंद्रराजे भोसले, राजासिंह ठाकूर, पत्रकार सुरेश चव्हाणके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यासाठी भाग्यतुषार जोशी यांनी परवानगी मिळावी म्हणून पोलिसांकडे अर्ज केला होता. परंतु, त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे 19 मार्च रोजी निघणारा मोर्चा आणि सभा होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे.
जलील यांचा विरोध...
दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज निघणाऱ्या हिंदू जनगर्जना मोर्चाला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. या मोर्च्यामुळे शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. तसेच बाहेरच्या काही लोकांना या मोर्च्यासाठी बोलवण्यात आले आहे. तर बाहेरून येणारे लोकांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची पार्श्वभूमी असून, यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं, जलील म्हणाले आहे. तर याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेत माहिती दिली असल्याचं देखील जलील म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :