Imtiyaz Jaleel : पोलिसांनी आता वर्दी उतरवून शिवसेना-बजरंग दलात प्रवेश करावा; खासदार जलील असे का म्हणाले?
Imtiyaz Jaleel On Police : उपोषण मागे घेतल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.
Imtiyaz Jaleel On Police : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसात अधिकच तापताना दिसत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी देखील यात उडी घेतल्याने यावरून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेलं साखळी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली आहे. मात्र उपोषण मागे घेतल्यानंतर जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांकडून आम्हाला शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे अशा पोलिसांनी वर्दी उतरवून शिवसेना किंवा बजरंग दलात प्रवेश करावा,असे जलील म्हणाले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात आलेल्या जलील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. मात्र आता पोलीसच शिवीगाळ करायला लागले असल्याने, आम्ही कुणाकडे न्याय मागितला पाहिजे. पोलीस चुकीच्या पद्धतीने वागत असून, वाईट पद्धतीने बोलत असल्याने आम्ही याबाबत कोणाकडे दाद मागावी. त्यामुळे माझं म्हणणे आहे की, अशा पोलिसांनी आता वर्दी उतरवून शिवसेना-बजरंग दलात प्रवेश घेतला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत पोलिसाच्या खुर्चीवर बसला आहात, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही एका धर्माचा, जातीचा, विचाराचे समर्थन न करता सर्वाना समान न्याय दिला पाहिजे असे जलील म्हणाले.
उद्या नामांतराच्या समर्थनात 'हिंदू जन गर्जना' मोर्चा...
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात आणि समर्थनात दोन्ही बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली जात आहे. दरम्यान उद्या (19 मार्च) रोजी शहरात सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने 'हिंदू जन गर्जना' मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील क्रांती चौकातून सकाळी 10 वाजता या मोर्च्याची सुरवात होणार आहे. या मोर्च्यासाठी वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी देखील पाठींबा दर्शवला असून, मोर्च्यात प्रत्यक्षात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील महत्त्वाचे नेते देखील या मोर्च्यात सहभागी होणार आहे. त्यामुळे उद्या निघणाऱ्या भव्य मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्याची तयारी करण्यात येत आहे.
जलील यांचे उपोषण मागे...
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचे प्रशासनाने आदेश काढल्यावर, याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 मार्चपासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समिती आणि इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत होते. मात्र गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेले हे उपोषण आपण स्थगित करत असल्याची घोषणा जलील यांनी शुक्रवारी संध्याकाळी केली. शहरातील वातावरण खराब होऊ नये यासाठी आपण उपोषण मागे घेत असल्याचे जलील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :