आधी पाच लाख दिले, आता 25 लाख मागितले, दोरीनं बांधून मारलं अन् चटके दिले; सासरच्यांकडून नऊ वर्ष अमानुष छळ झालेल्या संभाजीनगरच्या विवाहितेनं सांगितली आपबिती
Chhatrapati Sambhajinagar Crime : फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी गावात माहेरून पैसे आणावेत यासाठी एका 30 वर्षीय विवाहितेला दोरीने घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Chhatrapati Sambhajinagar Crime : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार आणि विशेषतः हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी गावात माहेरून पैसे आणावेत यासाठी एका 30 वर्षीय विवाहितेला दोरीने घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे तर तिच्यावर चटके देऊन अमानुष छळ करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीनुसार, पती, सासू-सासरे आणि दोन नणंदांनी मिळून तिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी, आरोपी नवरा व सासरच्या व्यक्तींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. गेल्या नऊ वर्षात या विवाहित महिलेसोबत नेमकं काय घडलं? याबाबत विवाहित महिला आणि तिच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना आपबिती सांगितली आहे.
आधी पाच लाख दिले, आता 25 लाख मागितले
याबाबत अमानुष छळ झालेल्या विवाहितेने म्हटले आहे की, गेल्या नऊ वर्षापासून माझा सातत्याने छळ सुरू होता. ते मला पट्ट्याने बांधायचे, मला मारहाण करायचे. नणंद आणि सासू-सासरे मला सोडवत नव्हते. माझा पती क्रुझर चालवतो. नऊ वर्षापासून हे सगळं सुरू होतं. पैसे आण, असं मला सांगितले जात होते. आधी पहिले पाच लाख रुपये दिले होते. आता 25 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाही म्हणून दररोज मारहाण करत होते. वडील आले त्यावेळेस मला बांधलेलं होतं. मला वडिलांनी सोडवलं आणि घरी आणलं. अजूनही आरोपींना अटक केलेली नाही. पोलीस वाले म्हणतात की, आम्ही त्यांना अटक करू. पण अजूनपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती महिलेने दिली आहे. श्रीमंताला न्याय मिळतो, आम्हा गरिबाला न्याय कधी मिळणार? असा सवाल देखील महिलेने उपस्थित केलाय.
जावयाला कठोरात कठोर शिक्षा करा
विवाहित महिलेच्या वडिलांनी म्हटले आहे की, शेत विकून जावयाला पाच लाख रुपये दिले होते. आता 25 लाख आणा, असे सांगण्यात आले. मुलीला मारहाण करण्यात आली. मी लग्नाला गेलो तेव्हा मुलीला भेटायला गेलो होतो. तिला बांधून ठेवलं होतं, मी गेल्यावर तिला सोडवलं. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुलीला वाटायचं, आज सुधारेल, उद्या सुधारेल, म्हणून तिने मला कधी सांगितलं नाही. माझ्या मुलीला न्याय द्या. मी काल पोलिसांकडे गेलो होतो तर नुसतं शोधतोय, असे म्हणतात. पोलीस वाले म्हणतात ते फरार आहेत. जावयाला कठोरात कठोर शिक्षा करा. माझ्या मुलीला बांधून चटके दिले जात होते. पण, घरातलं कोणीही तिला सोडवत नव्हतं.
नेमकं प्रकरण काय?
फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे एका ३० वर्षीय विवाहितेवर केवळ माहेरून पैसे न आणल्यामुळे दोरीने बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता, तिच्या शरीरावर चटके देऊन क्रूरपणे छळ करण्यात आला. या अमानुष मारहाणीत ती गंभीर जखमी झाली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पती अजीम अब्दुल शेख, नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख यांनी वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. "माहेरून पैसे आणा," या मागणीस नकार दिल्यामुळे तिला दोरीने घरात बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान तिच्या शरीरावर गरम वस्तूंनी चटके देण्यात आले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
आणखी वाचा
























