Chhatrapati Sambhaji Nagar : गारुड्यांनी लोकांना मुंगूस-सापाचा खेळ दाखवला; पण जाताना एक विषारी नाग विसरले
Chhatrapati Sambhaji Nagar : परिसरातील काही नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर वन विभागाच्या मदतीने सापाला जंगलात सोडण्यात आले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड तालुक्यात एक आगळेवेगळी घटना समोर आली आहे. शहरात आलेल्या गारुड्यांनी आधी लोकांना मुंगूस आणि सापाचा खेळ दाखवला. त्यानंतर काही पैसे जमा केले. पण जाताना आपल्याजवळ असलेल्या चार नागांपैकी एक नाग विसरून गेला. तब्बल तीन दिवस हा विषारी नाग एका बंदिस्त पिशवीत तेथेच पडून होता. मात्र परिसरातील काही नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर वन विभागाच्या मदतीने सापाला जंगलात सोडण्यात आले आहे. तर साप सोडून जाणाऱ्या गारुड्यांचा वन विभागाकडून शोध सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड शहरातील भराडी रोडवर एका हॉटेलजवळ तीन दिवसांपासून चार गारुडी (मदारी) मुक्कामी होते. यावेळी त्यांच्याकडे चार नाग देखील होते. दरम्यान या चारही गारुडी यांनी शहरातील विविध बाजार, शाळा आदी ठिकाणी मुंगूस सापाचा खेळ भरवला होता. यावेळी त्यांना नागरिकांनी पैसे देखील दिले. तर शनिवारी सिल्लोड शहरात खेळ करून हे गारुडी चिंचोली लिंबाजी येथे निघून गेले. मात्र याचवेळी त्यांच्याकडे असलेल्या चार सापांपैकी बंदिस्त पिशवीत असलेला एक विषारी नाग चुकून तेथेच विसरून गेले. दरम्यान, तीन दिवसांनंतर मंगळवारी सकाळी बाजूला असलेल्या हॉटेल मालकाला हिरव्या नायलॉनच्या पिशवीत काही तरी हालचाल करताना दिसले.
तीन किलो वजनाचा विषारी नाग आढळून आला...
हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका पिशवीत काहीतरी हालचाल करताना दिसल्याने त्या हॉटेल मालकाने तत्काळ याची माहिती पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धक डॉ. संतोष पाटील यांना दिली. तर माहिती मिळाल्यावर डॉ. संतोष पाटील तिथे पोहचले आणि त्यांनी सदर पिशवी ताब्यात घेतली. त्यात सहा फूट लांब आणि सुमारे अडीच ते तीन किलो वजनाचा विषारी नाग असल्याचा आढळून आला. त्यामुळे याची माहिती त्यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या मदतीने या भुकेल्या नागाला जंगलात सोडण्यात आले आहे.
वन विभागाकडून गारुड्यांच्या शोध
तर नाग हा शेड्यूल एकचा सरपटणारा प्राणी असून, त्याला जवळ बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे सदर गारुड्यांकडील साप हस्तगत करण्याची लेखी मागणी यावेळी डॉ. संतोष पाटील यांनी वन विभागाकडे केली. तर वनपथक संबंधित गारुड्यांच्या शोध घेत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे माध्यमांना बोलताना म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Crime News : फुकटच्या पाणीपुरीसाठी खुनी हल्ला; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना