मोदींचे अवास्तव उदात्तीकरण, 11 कलमी कार्यक्रम म्हणजे बोलघेवडेपणा; अंबादास दानवेंची खोचक टीका
Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना या महाविकास आघाडी आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सुरू होत्या.
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे पत्रकार परिषेदत दिली. दरम्यान, राज्य सरकारने घोषित केलेल्या याच 11 कलमी कार्यक्रमावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू असून, सरकारचा 11 कलमी कार्यक्रम म्हणजे बोलघेवडेपणा असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना या महाविकास आघाडी व काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सुरू होत्या. त्या योजनांचे फक्त नामांतर करण्यात आले असून या योजनांमध्ये सामान्य व गरीब लोकांच्या विकासासाठी कोणत्याही तरतुदी करण्यात आल्या नसल्याचे दानवे म्हणाले. तसेच, नमो महिला सशक्तिकरण योजनेअंतर्गत 73 लाख महिलांना विविध योजनेचा लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे. परंतु प्रत्यक्षात प्रमोद महाजन महिला कौशल्य योजना महिलांचे सक्षमीकरणासाठी यापूर्वी सुरू होती. तसेच 73 हजार शेततळे उभारण्यात येणार आहेत, यापूर्वीसुद्धा मागेल त्याला शेततळे योजना सुरू होते. त्यामुळे सरकारने फक्त ही अकरा कलमी योजना घोषित करून बोल घेवडेपणा केला असल्याचे टीकास्त्र अंबादास दानवे यांनी सोडले.
देशात यूपीएचे सरकार असताना गांधी घराण्यातील विविध व्यक्तींवर सुरू करण्यात आलेल्या योजनांवरती सध्याच्या केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आक्षेप घेतलेले आहेत. जर काँग्रेसच्या काळामध्ये शासकिय योजनांना व्यक्तीचे नावे देणे अयोग्य ठरत असेल, तर त्यांना दिलेला न्याय भारतीय जनता पक्षाला सुद्धा लागू होतो. कोणालाही वेगळा न्याय देणे योग्य नसून सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी अंबादास दानवेंनी केली.
नमो कामगार कल्याण अभियानावरून टीका
सुमारे 54 हजार बांधकाम कामगारांनी शासकीय योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जांपैकी 13 हजार बांधकाम कामगारांना मार्च 2023 पर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे 73 हजार बांधकाम कामगारांना नमो कामगार कल्याण अभियान अंतर्गत संच वाटप हा कार्यक्रम कामगारांना दिशाभूल करणारा असल्याचा आक्षेप अंबादास दानवे यांनी नोंदवला.
संबंधित बातम्या: