मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाशिकमध्ये दाखवले काळे झेंडे, युवक काँग्रेस आक्रमक
Nashik News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप करून फडणवीस सातपूरकडे जाताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

Devendra Fadnavis नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. 34 व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप करून देवेंद्र फडणवीस हे सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) काळात कामे होत नाही. गुन्हेगारी वाढली आहे, अशा कारणांवरून काळे झेंडे दाखवण्यात आले. युवक काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी हे झेंडे दाखवल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांनी नाव मोठं केलं
दरम्यान, पोलीस क्रीडा स्पर्धाचा समारोपाप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांचे काम ताण तणावाचे आहे, खेळातून समाधान मिळते. खेळातून खेळाडू वृत्ती मिळते. यातून दुःख किंवा आनंद या दोन्ही गोष्टी मिळतात. संघ भावना तयार होते, खिलाडू वृत्ती तयार होते. पोलीस असो किंवा कुठलेही क्षेत्र तो उत्तम काम करतो. कोविडमध्ये स्पर्धा बंद होत्या. मागील वर्षीपासून सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांनी आपले नाव मोठे केले आहे.
पोलीस दलाचे भविष्य उज्ज्वल
ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.कोणत्याही पारितोषिकामुळे अधिक चांगले करण्याची प्रेरणा मिळते. वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत. रोजच्या कामातून डोक्याला शांती मिळविण्यासाठी एकमेकांना भेटण्यासाठी वेळ मिळाला आहे. पोलीस दलाचे भविष्य उज्ज्वल आहे. कधी टीका होते, एखाद्याने काम केले तरी टीका होते पण आपण जी शपथ घेतो त्यातून काम करावे.
अंमली पदार्थ विरोधातली लढाई लढावी लागेल
राज्याचा गृहमंत्री म्हणून पोलीस कुटूंबाला आश्वस्त करतो, चांगली, स्वतःची घर मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुलांच्या आरोग्याच्या योजना राबवित आहोत. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अंमली पदार्थांचे मोठे आव्हान आहे. अंमली पदार्थ विरोधातली लढाई लढावी लागेल. ही लढाई आपण जिंकू ही तुमचाकडून अपेक्षा आहे.
पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू
जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत जलरथ उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 67 लाख टँकर आपण भरू शकतो एवढं काम झालं आहे. हे अल निनोचे (El Nino) वर्ष आहे, अडचण येणारच, पाणी कमी आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे. 2023-24 या अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू आणि पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू, ज्यामुळे पुढे शेतकऱ्यांना मदत होईल.
आणखी वाचा























