Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील मूर्ती व्यवसायिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका, मूर्ती विरघळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान
भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांसह कुंभार समाजाला देखील बसला आहे.
Bhandara News : यावर्षी भंडाऱ्यातील (Bhandara) नागरिकांना देवघरात बसवायला मूर्तीच मिळणार की नाही अशी परिसथिती निर्माण झाली आहे. कारण भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली. त्यामुळं तिथे पूर आला होता. आता पूर ओसरला असून या पुरानं दिलेल्या जखमा आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. याचा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचबरोबर कुंभार समाजाला देखील पुराचा फटका बसला आहे. येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी व गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या मुर्ती पुराच्या पाण्यात विरघळल्यानं मूर्ती व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळं एन उत्सवाच्या तोंडावर मूर्ती व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे कधी नव्हे तो अतिवृष्टिने पूर आला होता. सलग दोन दिवस अख्खया गावाला पाण्याने वेढले होते. आंधळगावातील कुंभार समाज देशोधडीला लागला आहे. भंडारा जिल्ह्याच्या विचार केल्यास आंधळगावात सर्वाधिक गणेशमूर्ती बनतात. येथे जवळ जवळ 50 कुटुंबाचा कुंभार समाज आहे. जिल्ह्यात केवळ या एका भागात शेकडो गणेशमूर्ती तयार होतात. येथील तयार मुर्तीला जन्माष्टमी व गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिह्यात व जिल्ह्याबाहेर मोठी मागणी असल्यानं आंधळगावातील स्थानिक कुंभार बांधव सद्या मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त होता. जवळपास हे उत्सव निघून जातील इतक्या मुर्त्या तयार झाला होत्या. मात्र आंधळगावात झालेल्या अतिवृष्टिनं कुंभार समाजाचे होत्याचे नव्हते झाले.
अनेक मूर्तिकारांच्या मुर्ती पावसामुळं भिजून गेल्याने नष्ट झाल्या आहेत. अनेक तयार मुर्ती वीरघळून गेल्या आहेत. वर्षभर घाम घालून तयार केलेल्या या मुर्तीवर या मुसळधार पावसानं पाणी फिरले आहे. दिवस रात्र मेहनत करुन तयार केलेला मूर्ती चिखलमय झाल्या आहेत. यामुळं मूर्तीकरांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. यात कुंभार समाजाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
भंडाऱ्यात पुन्हा पावसाला सुरुवात
सध्या राज्यात पावासाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. भंडाऱ्यात (Bhandara) देखील सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आज हवामान विभागानं भंडाऱ्याला यलो अलर्ट दिला आहे. आधीच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे मठं नुकसान झालं होते. आता सकाळपासून पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आस्मानी संकट येण्याची शक्यता आहे.
भंडाऱ्यात आज सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट मिळाला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी हाहाकाराच्या जखमा ताज्या असल्याने आता होत असलेला पाऊस धडकी वाढवणारा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट घोंगावत असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने नदी नाले तुंडूंब भरुन ओसांडून वाहू लागले आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: