Bhandara News : भंडाऱ्यात स्लॅबवरुन उडी घेण्याच्या खेळात बालकाचा खाली पडून मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Bhandara News : घराच्या स्लॅबवरुन उडी घेण्याच्या खेळात खाली पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. उमंग प्रशांत साखरवाडे असं नऊ वर्षीय मृत बालकाचं नाव आहे.
Bhandara News : सध्या सगळ्यांचंच आयुष्य धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे. मुलांचं भविष्य चांगलं असावं, त्यांना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी आई-वडील दोघेही नोकरी करत आहेत. घर आणि नोकरी अशी तारेवरची करताना पालकाचं मुलांकडे काही दुर्लक्ष होतं आणि एखादी दुर्घटना घडते. अशीच दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. घराच्या स्लॅबवरुन उडी घेण्याच्या खेळात खाली पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यात घडली आहे. उमंग प्रशांत साखरवाडे असं नऊ वर्षीय मृत बालकाचं नाव आहे. मृत उमंग हा गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
उंचावरुन जमिनीवर कोसळला आणि निपचित पडला...
ही घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी या गावात घडली. उमंग प्रशांत साखरवाडे हा मुलगा आणि त्याचा धाकटा भाऊ सोमवारी (31 जुलै) शाळा आटोपून घरी आले. घरी कुणीही नसताना घराच्या स्लॅबवरुन लगतच्या दुसऱ्या घराच्या स्लॅबवर उडी मारण्याचा चित्तथरारक खेळ दोन्ही भावंडं खेळत होते. मात्र यावेळी मोठा भाऊ स्लॅबवरुन उडी मारताना तोल जाऊन थेट उंचावरुन जमिनीवर कोसळला. यात त्याच्या शरीरात अंतर्गत जखमा झाल्याने तो निपचित पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ स्लॅबवरुन खाली कोसळल्याने लहान भावाने धावत जाऊन ही बाब शेतात काम करत असलेल्या वडिलांना सांगितली. वैद्यकीय उपचारासाठी नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नाशिकमध्ये झोका खेळत असताना गळफास लागल्याने मुलाचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अशीच काहीशी घटना घडली होती. घरात दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिकच्या अंबड भागातील (Ambad) चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. निखिल निंबा सैंदाणे याला घरातील छतास लोखंडी हुकला लावलेल्या झोक्याच्या दोरीचा फास बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडील कंपनीमध्ये कामाला गेले होते. तर आई काही कामासाठी शेजारी गेली होती. निखिल आणि त्याचा लहान भाऊ घरात एकटेच झोका खेळत होते. धाकट्याचा झोका घेऊन झाल्यावर निखिलने झोका खेळायला सुरुवात केली. पलंगावरुन तो झोका खेळत होता. त्याने झोका गोल गोल फिरवला आणि त्याच्या मानेला झोक्याची दोरी आवळली गेली. आधी तो पलंगावर असल्याने त्याला ते जाणवले नाही मात्र त्याने उंच झोका घेण्याचा प्रयत्न त्याच्या गळ्याला फास लागला आणि तो खाली पडला. निखिल खाली पडल्यानंतर काहीच बोलत नसल्याने त्याचा भाऊ धावतच आईकडे गेला. निखिल झोक्यावरुन पडला असून काहीच बोलत नसल्याचे आईला सांगितले. निखिलच्या आईने तातडीने घराकडे धाव घेतली. निखिल निपचित पडला होता. आईने तात्काळ दोरी कापून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सगळं संपलं होतं.
हेही वाचा