Maharashtra Unseasonal rain: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; नागपूर, भंडाऱ्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं
Maharashtra Unseasonal rain: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. कोकण आणि विदर्भात अवकाळी पावसामुळे फटका. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.

Maharashtra Unseasonal rain: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान (Crops Loss) होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भातील शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. यावेळी जोरदार वारेही वाहत होते. त्यामुळे काही भागांमध्ये झाडं उन्मळून पडली. तर नागपूरच्या मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला. (Vidharbha Unseasonal rain)
तर दुसरीकडे भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. भंडाऱ्यात पहाटे पाच वाजतापासून विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं चना, तुर, मुग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर, उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. हवामान विभागाने 23 आणि 24 फेब्रुवारी या दोन दिवसात विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Gondia Rain: गोंदियात पहाटेपासून पावसाला सुरुवात
गोंदियात सोमवारी सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे फायदा होऊ शकतो. तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Ratnagiri Rain: रत्नागिरीतील पावसाने आंबा उत्पादकांची चिंता वाढवली
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला होता. रत्नागिरीच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे येथील आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. सध्या आंब्याच्या झाडांना मोहोर आला आहे. काही ठिकाणी झाडांना फळंही लागली आहेत. मात्र, कालचा सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मोहोर आणि ही फळं गळून पडली आहेत. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
Latur Rain: लातूरमध्ये रात्रीपासून पावसाची हजेरी
मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर लातूर शहर व परिसरात दिलासा देणारा पाऊस पडत आहे. मध्यरात्री सुमारे तीन वाजता शहरातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सकाळी सहा ते सातच्या सुमारास राजीव गांधी चौक, उद्योग भवन, गरुड चौक या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शहराच्या विविध भागांत वेगवेगळ्या वेळेला पावसाच्या सरी कोसळल्याने काही काळासाठी रस्त्यांवर पाणी साचले. मात्र या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
आणखी वाचा
अजित पवारांच्या विमानाचा 'तो' पायलट जिवंत आहे का, अपघातामागे सुनियोजित कट? अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

























