Prakash Solanke : गेल्या 45 वर्षांत बीडमध्ये मराठा मंत्री नाही, मंत्रिपद ओबीसीसाठी राखीव आहे का? राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंची खदखद
Beed Cabinet Minister : मी जर ओबीसी असतो तर मंत्री झालो असतो, मंत्रिपदाच्या आड माझी जात येते अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली.

बीड :माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा परतण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येतंय. मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते, मी ओबीसीमध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती अशी खदखद प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली. तसेच गेल्या 45 वर्षांमध्ये बीडमधील मराठा समाजाचा व्यक्ती कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही, बीड हा ओबीसीसाठी राखीव आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला.
नेमकं काय म्हणाले प्रकाश सोळंखे?
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा. त्यांना बीडचे पालकमंत्री करावे किंवा राज्य पातळीवरील मोठं पद द्यावं, त्यांना शुभेच्छाच आहेत. गेल्या 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही. ज्या समाजाने पक्षाला सातत्याने ताकद दिली त्या समाजाला कुठेतरी डावललं जातंय ही वस्तुस्थिती आहे. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का?"
बीडमध्ये मराठा समाजाला डावललं गेलंय
प्रकाश सोळंके म्हणाले की, "गेली 35 वर्षे मी राजकारणात आहे. या जिल्ह्यात नेतृत्वाने नेहमीच ओबीसींना प्राधान्य दिलं आहे. त्यामध्ये काही चुकीचं आहे असं नाही. ती नेतृत्वाची विचारधारा आहे. 1980 साली माझे वडील हे या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री होते, पालकमंत्री होते. त्यानंतर 45 वर्षानंतर या जिल्ह्यात मराठा समाजाला संधी दिली नाही ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाज हा सातत्याने राष्ट्रवादीच्या मागे आहे. पण मराठा समाजाला डावलण्याचं काम झालेलं आहे."
सर्वांना एकत्रित घेऊन राजकारण करण्याची नीती ही पक्षाच्या नेतृत्वाची आहे. पण त्याचवेळी मराठा समाजाला डावलण्याचं कामही त्यांच्याकडून झालं आहे. या आधी आपण पवार साहेब, अजितदादा यांच्याकडे वेळोवेळी ही खंत व्यक्त केली आहे असंही प्रकाश सोळंके म्हणाले.
धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर आलं. वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्याचवेळी त्यांच्यावर कृषिखात्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही होता. पण कृषिखात्यातील कथित घोटाळ्यात धनंजय मुंडेंना क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याचे संकेतही अजित पवारांनी दिले. आणखी एका प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला की त्यांना पुन्हा संधी देऊ, असं अजित पवार म्हणाले.
ही बातमी वाचा:























