Beed Railway : अखेर मुहूर्त ठरला! आष्टी-नगर रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित
Beed Railway : . 23 सप्टेंबर रोजी आष्टी-नगर रेल्वेचा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे.
बीड : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत गेल्या अनेक दिवसांपासून एकाच जागेवर उभा असलेल्या आष्टी-नगर रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे. 23 सप्टेंबर रोजी आष्टी-नगर रेल्वेचा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या इतिहासात सूवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा दिवस आता जवळ आला आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित राहणार आहेत. आष्टी येथे हा रेल्वेच्या लोकार्पणचा सोहळा पार पडणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होणार आहे. याचा लोकार्पण सोहळा आष्टी येथे होत आहे. यापूर्वी अनेक वेळा या रेल्वेच्या उद्घाटनाचे मुहूर्त ठरले होते. मात्र ऐनवेळी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात येत होता. अखेर आता 23 सप्टेंबर हा दिवस निश्चित करण्यात आलाय. नगर परळी रेल्वे मार्गाची 261 किलोमीटर एवढी लांबी आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी देखील पूर्ण झाली आहे. परंतु, केवळ लोकार्पण सोहळ्याच्या प्रतिक्षेत ही रेल्वे सुरू होत नव्हती.
नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी असा 67 किलोमीटरच्या कामाचा टप्पा पूर्ण झाला असून त्यावर यशस्वी रेल्वेची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र नगर ते आष्टी रेल्वेच अधिकृत उद्घाटन करण्यास मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे या मार्गावर धावणारी रेल्वे नगर रेल्वे स्थानकावर तीन महिन्यापासून एकाच जागेवर उभी आहे. याकडे बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी विशेष लक्ष घालून आष्टी नगर रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
बीडवासीयांचं स्वप्न पूर्ण
बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जवळपास तीस वर्षानंतर बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न आता साकार होत आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर 29 डिसेंबर 2021 रोजी रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवासी रेल्वे सुरू होण्याचा दोन वेळेस मुहूर्त ठरला. परंतु, ऐनवेळी सगळे मुहूर्त लांबले आणि आता दहा महिन्याच्या कालावधीनंतर रेल्वे सुरू होईल. त्यामुळे बीडच्या नागरिकांचं जवळपास 30 वर्षांनी पूर्ण होत आहे.