भाजप आमदार महोदयांची राऊडी स्टाईल, मिल कामगारांच्या पगारासाठी अधिकाऱ्यावर उगारली पाणी बॉटल
अचलपूर फिनले मिलच्या कामगारांचं पगार आणि देणीसंदर्भातील आंदोलन यशस्वी झालं असून बैठकीनंतर तोडगा निघाला.

अमरावती : केंद्र सरकारच्या एनटीसीमार्फत महाराष्ट्रात मुंबईसह सोलापुरातील बार्शी आणि अमरावती येथील अचलपूर (Amravati) येथे सुरू असलेल्या गिरण्या कोरोना लॉकडाऊनपासून बंद आहेत. या मिलमधील कामगारांची देणी देखील थकली आहेत. सरकारने गेल्या काही महिन्यांतील देणी व पगारी दिल्या. मात्र, त्यानंतर, पुन्हा कामगारांच्या पगारी आणि देणी थकल्याने कामगारांवर उपासमारिची वेळ आली आहे. त्यामुळे, कामगारांनी आपली पगार व देणी मिळावी म्हणून फिनले मिलच्या गेटसमोर आंदोलन केलं. त्यातच, आज या कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत भाजप आमदार प्रवीण तायडे (MLA) यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं. कामगारांच्या पगारी व देणीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार महोदयांचा रावडी राठोड अवतार पाहायला मिळालां. त्यांनी मिल प्रशासनातील अधिकाऱ्याच्या अंगावर पाण्याची बॉटल फेकण्यासाठी हात उगारल्याचे पाहायला मिळालं.
अचलपूर फिनले मिलच्या कामगारांचं पगार आणि देणीसंदर्भातील आंदोलन यशस्वी झालं असून बैठकीनंतर तोडगा निघाला. भाजपचे आमदार प्रवीण तायडे आक्रमक होताच संबंधित अधिकाऱ्यांनी कामगारांच्या देणीसंदर्भाने वरिष्ठांसोबत सकारात्मक चर्चा केली. विशेष म्हणजे या बैठकीवेळी अधिकाऱ्यांच्या अंगावर पाण्याची बॉटल फेकून मारण्याचा प्रयत्न आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
फिनले मिल प्रशासनाने पुढील 2 महिन्यांमध्ये कामगारांचे सर्व वेतन आणि मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर कामगारांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. गेल्या दोन दिवसांपासून मिलच्या चिमणीवर दोन कामगार ठिय्या मांडून आणि शेकडो कामगार खाली आंदोलन करीत होते. आमदार प्रवीण तायडे आणि फिनले मिल प्रशासनासोबत आज बैठक घेतली. त्यावेळी, संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना आमदार महोदयांनाच राग अनावर झाल्याचं दिसून आलं. यावेळी, टेबलावर असलेली पाण्याची बाटली त्यांनी आदळली, तर राऊडीस्टाईलने अधिकाऱ्याच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, मिलमधील चिमणीवर (धुराडे) बसून 2 दिवसांपासून आंदोलन केलेल्या दोन्ही कामगारांची प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, फिनले मिल ही वस्त्रोद्योग महामंडळाअंतर्गत चालवला जाणार उद्याोग आहे. मात्र, देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून या मंडळाच्या सर्वच गिरण्या बंद असून मिल सुरू करण्याची मागणी कामगार सातत्याने करत आहेत. मात्र, गेल्या 5 वर्षांपासून मिलचा भोंगा बंदच आहे.
हेही वाचा
नांदेडमध्ये खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; मामाच्या गावी आलेल्या संघर्षने गमावला जीव, गावात हळहळ




















