(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Murder Case : आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएला 90 दिवसांची मुदतवाढ, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाकडून विनंती मान्य
Umesh Kolhe Murder Case : व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केलेली असून चारजण अद्यापही फरार आहेत. ठोस आणि विश्वासार्ह पुरावे शोधण्यासाठी तपास यंत्रणेला वाढीव मुदतीची गरज आहे
अमरावती : अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास करणा-या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टनं यासंदर्भात तपासयंत्रणेनं दाखल केलेला अर्ज स्वीकारला आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. 21 जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलनं घरी परतत असताना रात्री साडे 10 च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. प्राथमिक चौकशीतून पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात केली होती. त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य पाहता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यानंतर एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. हा खटल्याची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
या प्रकरणातील तपास पूर्ण झालेला नसून आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखीन 90 दिवासांची आवश्यकता असल्याचं एनआयएकडून न्यायालयाला सांगण्यात आलं. याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केलेली असून चारजण अद्यापही फरार आहेत. ठोस आणि विश्वासार्ह पुरावे शोधण्यासाठी तपास यंत्रणेला वाढीव मुदतीची गरज आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसून सतत तपासयंत्रणेची दिशाभूल करत आहेत. परिणामी, मागील आठवड्याभरात 20 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याचंही एनआयएनं कोर्टाला सांगितलं. एनआयएच्या या अर्जाला आरोपीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला होता. मात्र दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखीन 90 दिवसांची मुदत दिली आहे.
संबंधित बातम्या :
Amravati Murder Case : अमरावती खून प्रकरणात मोठा खुलासा, याआधी उमेश कोल्हेंच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न