(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke : 'निवडणुकीचा निकाल ठरलाय, कम से कम दो लाख', निलेश लंकेंची तुफान फटकेबाजी, विखे पाटलांवरही डागली तोफ!
Ahmednagar Lok Sabha : निवडणूकीचा निकाल ठरलेला आहे, "कम से कम दो लाख", असं म्हणत निलेश लंके यांनी 2 लाख मतांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी विखे पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
Nilesh Lanke : निलेश लंके (Nilesh Lanke) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Ahmednagar Lok Sabha Constituency) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके (Sujay Vikhe Patil vs Nilesh Lanke) लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला.
यावेळी निलेश लंके म्हणाले की, निवडणूकीला सामोरे जाण्याआधी मतदारसंघातील समस्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे. "स्वाभिमान जनसंवाद" यात्रेच्या माध्यमातून या समस्या जाणून घेणार आहोत. मोहटा देवीचे दर्शन घेऊन सुरू झालेली ही स्वारी आता थेट दिल्लीत जाऊन थांबेल, असे त्यांनी म्हटले.
सुजय विखेंच्या साखर-डाळ वाटप कार्यक्रमावर टीका
निवडून आल्यानंतर थेट 5 वर्षांनी काहीजण डाळ-गूळ वाटायला आले, असे म्हणत निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या साखर-डाळ वाटप कार्यक्रमावर टीका केली. स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मला संधी दिल्यास प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करणार
दक्षिण नगर जिल्ह्यातील 75 टक्के भाग दुष्काळी भाग आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, इथली बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला संधी दिली तर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करणार, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
विखेंनी आमच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी बोर्ड लावले
साकळाईचे पाणी आणले नाही तर मतं मागणार नाही असं विखे म्हणाले होते, त्यांना लोकांनी विचारलं पाहिजे पाण्याचे काय झाले? नगर-पाथर्डी रस्त्याचे काम माझ्यामुळे झाले, जवळपास 450 लोकांचा या रस्त्यावर मृत्यू झाला. विखेंना पाथर्डी तालुक्यात यायचे असेल तर ते हेलिकॉप्टरने यायचे. आम्ही या रस्त्यासाठी उपोषण केले म्हणून नगर-पाथर्डी रस्ता झाला आणि विखेंनी आमच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी बोर्ड लावले. मी मोहटादेवीचा सच्चा भक्त आहे, देवीचे दर्शन घेऊन मी काम सुरू केलय आता थेट दिल्लीतच जाऊन थांबणार आहे. कोविड काळात काहींनी रेमेडीसीव्हीर आणल्याचे सांगितले, पण ते फक्त त्यांच्या बगलबच्चांना दिले, अशी टीका त्यांनी निलेश लंके यांनी सुजय विखेंवर केली.
निवडणुकीचा निकाल ठरलाय, कम से कम दो लाख
काहीजण असे असतात की, राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून संपत्ती कमवायची, पण आम्ही दुसऱ्या पध्दतीत काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही राजकारणातून सत्ता मिळवतो आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. जनता ही राजा आहे, जनता ठरवेल आम्हाला कोणत्या पदावर बसवायचे. बऱ्याच वेळा लोक सांगतात लोकसभा निवडणुकीत मोठी यंत्रणा येणार आहे, ही यंत्रणा-बिंत्रणा काहीही नाही ते डब्बेवाले आहेत, अशी टीका त्यांनी विखे यंत्रणेवर केली आहे. निवडणूकीचा निकाल ठरलेला आहे, "कम से कम दो लाख", असं म्हणत निलेश लंके यांनी 2 लाख मतांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
आणखी वाचा