MNS : मनसे-भाजप-शिवसेना युतीचं अडलं कुठे? भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास मनसेचा नकार? आतापर्यंत काय घडलं?
MNS Mahayuti Alliance : मनसेने भाजप आणि शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती आहे. त्याचवेळी मनसेने मात्र त्याला नकार दिल्याचं समजतंय.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Maharashtra Lok Sabha Election) महाराष्ट्रात भाजप -सेना-मनसे युतीच्या (MNS BJP Alliance) चर्चा जोरदार होत्या. गेल्या काही महिन्यात शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यातल्या युतीच्या हालचालींना वेग आला होता. मात्र आता या चर्चा थंड झालेल्या आहेत. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनसेने नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. मनसे भाजप शिवसेना युतीचा नेमकं अडलंय कुठे पाहूया हे पाहुयात.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांत जागावाटपासाठी वेगवान घडामोडी होत आहेत, उमेदवारी जाहीर होत आहेत. भाजपला देशात 400 जागांचे ध्येय पार करण्यासाठी राज्यात मनसेलाही सोबत घेण्याबाबत हालचाली झाल्यात. यामध्ये स्वतः राज ठाकरे आणि अमित शहा यांची यासंदर्भात भेट झाली. तर दुसरीकडे राज्यातील प्रमुख नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचीदेखील राज ठाकरे यांच्यासोबत भेटून चर्चा झालेली आहे. मात्र या सगळ्या चर्चेअंती फक्त चर्चाच आहेत, निर्णय अजून झालेला नाही. लवकरच याबाबत स्पष्ट निर्णय येणे अपेक्षित आहे.
मनसे भाजप सेनेत आतापर्यंत काय घडलं?
- मनसे भाजप शिवसेना नेत्यांची प्राथमिक पातळीवर युती संदर्भात चर्चा झाली.
- त्यानंतर मनसे नेत्यांनी राज्यातील दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी परत चर्चा केली.
- यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.
- दिल्लीतून या संदर्भातला ग्रीन सिग्नल आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली.
- महाराष्ट्रातील लोकसभा जागांवर प्रचार करण्यासाठी मनसेने देखील आपण मदत करण्याचं ठरलं.
- यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये तीन प्रस्तावावर चर्चा झाली. मनसेने दोन्ही पक्षांकडे तीन जागांची मागणी केली.
- चर्चेअंती मनसे दोन जागांवर आली आणि एक जागावर दोन्ही पक्षाकडून मनसेला ग्रीन सिग्नल मिळाला.
- मनसेने आपल्या चिन्हावर लढावं यासाठी भाजप सेनेची अट. मनसे लढली तर शिवसेना भाजप चिन्हावर लढावं असा आग्रह खासकरुन शिंदेंचा होता. पण ते मनसेला मान्य नाही.
- मनसेला दुसरा पर्याय दिला गेला. मनसेने लोकसभा लढवू नये, राज्यसभा किंवा विधानपरिषदेत जागा दिल्या जातील. पण त्यावर ही मनसे राजी नाही.
मनसे-भाजप युतीची चर्चा थांबली
राज्यात मनसेला भाजप सेनेने सोबत घेण्यासंदर्भात सर्व बाबींची चर्चा झाल्या. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर भाजप शिवसेना मनसे नेत्यांपासून वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली . मात्र वाटाघाटी संदर्भात सविस्तर चर्चा करत असताना एकमेकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने युतीची बोलणी थांबल्याचे चित्र सध्या आहे
मनसे-सेना-भाजप युती संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेला जोर पकडला. मात्र युती संदर्भात बोलणे सुरू असताना तिन्ही पक्षात एकमेकांच्या असलेल्या अटींमुळे या चर्चा काही दिवस थांबल्या आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, लवकरच या संदर्भातला निर्णय होईल असं दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
मनसेचं मौन
मात्र मनसे नेत्यांनी या युती संदर्भात बोलण्यासाठी मौन बाळगलं आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती संदर्भात नेत्यांना बोलू नका अशा सूचना दिलेल्या आहेत. जो काही मनसेचा निर्णय असेल तो राज ठाकरे जाहीर करतील.
त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये सभा पार पडणार आहे. या सभेमध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या युती संदर्भात स्पष्ट भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेव्हाच कळेल की नक्की युतीत मनसे येणार की नाही? मात्र दुसरीकडे भाजप मनसे नेते या युती संदर्भात चर्चा सुरू आहे आणि लवकरच ही युती होईल असे संकेत देत आहेत. त्यामुळे मनसे-भाजप-सेना युती होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा: