(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke : निलेश लंकेंना मोठा धक्का, स्वतःच्या मतदारसंघातील बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठींबा
Ahmednagar Lok Sabha Constituency : निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला आहे. निलेश लंकेच्या स्वतःच्या मतदारसंघातील बड्या नेत्याने सुजय विखेंना पाठींबा दिला आहे.
Ahmednagar Lok Sabha Constituency : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र निवडणुकीआधीच निलेश लंकेंना स्वतःच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पारनेरचे माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र आज त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. विजय औटी यांनी सुजय विखेंना पाठींबा दिल्याने महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही उमेदवारांच्या कामाची पद्धत पाहून घेतला निर्णय - विजय औटी
याबाबत विजय औटी म्हणाले की, तालुक्यातील आमचे कार्यकर्ते रामदास भोसले, श्रीकांत पठारे, अनिल शेटे आणि प्रियंका खिलारी यांनी एकत्रित निर्णय घेतला आहे. सुजय विखेंना पाठींबा देताना आम्ही दोन्ही उमेदवारांचे विचार, कामाची पद्धत आणि अनुभवाचा विचार केला आहे. विखे पाटील यांनी पाच वर्षे चांगलं काम केलंय. सुजय विखेंना आणखी पाच वर्षे संधी मिळाली, तर ते चांगले काम करू शकतात. एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल.
विखेंनी गेल्या पाच वर्षांत चांगले काम केलंय - विजय औटी
ते पुढे म्हणाले की, प्रचारात महाविकास आघाडीकडून देशाच्या संरक्षणासह इतर महत्त्वाचे विषय मांडले जात नाहीत. स्थानिक मुद्द्यांना अवास्तव महत्व दिले जात आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असूनही आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. विखेंनी गेल्या पाच वर्षांत चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचे औटी यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले सुजय विखे?
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांनी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. यावर सुजय विखे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे शोषण झाले आहे. गोरगरीब जनता आणि नेत्यांना प्रशासनाचा वापर करून हिनवण्याचा प्रकार झाला आहे. जेव्हा 4 जूनला निकाल लागेल त्या दिवशी पारनेर तालुक्याचे मतदान पहा आणि तेच या माझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर राहणार असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
PM मोदींच्या सभांवरून शरद पवारांची टीका; सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला, निलेश लंकेंनाही डिवचलं!