(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM मोदींच्या सभांवरून शरद पवारांची टीका; सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला, निलेश लंकेंनाही डिवचलं!
Sujay Vikhe on Sharad Pawar : नरेंद्र मोदींच्या राज्यात जास्तीत जास्त सभा व्हाव्या, यासाठी पाच टप्प्यात निवडणूक घेतल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. यावरून सुजय विखेंनी शरद पवारांवर निशाणा साधला.
Sujay Vikhe On Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) राज्यात जास्तीत जास्त सभा व्हाव्या, यासाठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. यावरून भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात होणाऱ्या सभांवरून त्यांना टोला लगावला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते असून यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, मात्र ते नगरमध्येच पाच ते सहा सभा घेत आहेत. तर अजूनही काही कॉर्नर सभा ते घेणार असल्याचं मला कळलं आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवर बोलणे हे हास्यास्पद असल्याचा टोला सुजय विखेंनी शरद पवारांना लगावलाय.
सुजय विखेंचा शरद पवारांवर आरोप
मुंडे आणि विखे परिवाराला शरद पवारांनी कायम त्रास देण्याच काम केलं असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी केला आहे. सुजय विखे सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. या प्रचार सभेत पवारांसोबत होत असलेल्या संघर्षाबाबत बोलताना गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि बाळासाहेब विखे (Balasaheb Vikhe) सर्वसामान्यासाठी एकत्र आले. त्यावेळी पवारांनी कायमच आमच्या दोन्ही परिवाराला वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून त्रास देण्याचे काम केलं. मात्र, आमच्या दोन्ही परिवारांनी संघर्ष केला. या जनतेने आम्हाला साथ दिली. त्रास जरी झाला तरी आम्ही संघर्ष सोडला नाही, असे देखील सुजय विखे यांनी म्हटले आहे
लंकेंचा खरा चेहरा समोर आला
तसेच, दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपल्या भाषणादरम्यान पोलीस प्रशासनाला धमकी दिली होती, यावर बोलताना भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पांडुरंगाचे आभार मानेल की समोरच्या उमेदवाराचा खरा चेहरा भाषणाच्या माध्यमातून समोर आला. ही गोष्ट एकदा घडली नसून दोनदा घडली आहे. शेवगाव येथे देखील सभेदरम्यान शरद पवारांसमोर उमेदवार पोलिसांबद्दल बोलले. अशा प्रकारची प्रवृत्ती अहिल्यानगरची जनता कदापीही स्वीकारणार नाही. हा खरा चेहरा जनतेपुढे आला, याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली.
अहमदनगरमधील मोदींची सभा पुढे ढकलली
अहमदनगर शहरात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जाहीर सभेची तारीख पुढे ढकलली असल्याची माहिती सुजय विखेंनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ सहा मे रोजी नगर शहरात सभा होणार होती. मात्र आता पंतप्रधान मोदींची सभा ही 7 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा एक दिवसाने पुढे ढकलला असल्याचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. नगर शहरातील संत निरंकारी भवन जवळील अठरा एकर मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर निवडणुकीचे वातावरण बदलून जाते आणि प्रचाराचा विषयच संपून जातो, असा विश्वास विखेंनी व्यक्त केलाय.
पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे शोषण
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांनी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. यावर सुजय विखे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे शोषण झाले आहे. गोरगरीब जनता आणि नेत्यांना प्रशासनाचा वापर करून हिनवण्याचा प्रकार झाला आहे. जेव्हा 4 जूनला निकाल लागेल त्या दिवशी पारनेर तालुक्याचे मतदान पहा आणि तेच या माझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर राहणार असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा