Ashadhi wari 2023 : यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात माऊली जेजुरीत दाखल, आजचा मुक्कात जेजुरीत तर तुकोबांच्या पालखीचा मुक्कात वरवंडमध्ये!
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत स्वागत करण्यात आलं.
Ashadhi wari 2023 : ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत स्वागत करण्यात आलं. जेजुरीकरांनी पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली. दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने जेजुरीकर पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. तर संत तुकाराम महाराजांची पालखीने यवतकरांना निरोप देत वरवंड येथे दाखल झाली आहे. यावेळी वारकऱ्यांनी अभंग आणि भजनाचं गजर करत यवत ते वरवंड प्रवास केला. संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंड येथे मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आज जेजुरीत मुक्काम असणार आहे.
'बळीराज्यासाठी साकडं'
सासवड आणि यवतमध्ये दोन्ही पालख्यांची गावकऱ्यांनी सेवा केली. वारकऱ्यांच्या भोजनाची सोय आणि त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी केंद्रदेखील उभारण्यात आले होते. सासवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांनी आपल्या राहोट्यांमध्ये वारकऱ्यांनी विसावा घेतला होता. रात्री अनेकांनी भजन आणि अभंगाच्या ओळी गायल्या. यावेळी शहराला प्रसन्नदायी वातावरण प्राप्त झालं होतं. त्यानंतर पालखी सकाळी माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ झाली होती. ऊन अंगावर घेत लाखो वारकरी जेजुरीकडे मार्गस्थ झाले होते. प्रवासादरम्यान येणाऱ्या गावकऱ्यांनी माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि बळीराज्यासाठी साकडं घातलं.
'वारकरी खंडोबाचं दर्शन घेणार'
ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवडमध्ये माऊलीला निरोप देताना पालखी ही जेजुरी नाक्यापर्यंत खांद्यावर आणण्याची प्रथा आहे. जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष झाला . ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीची आस लागलेली असते अनेक वारकरी जेजुरी गड चढून खंडोबाच दर्शन घेतली.
माऊलींच्या स्वागतासाठी खंडोबाची जेजुरी सजली होती. पालखी येताच रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी भंडाऱ्यांची उधळण करण्यात आली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सोबतच यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा हजारो जेजुरीकरांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2023 अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘हरित वारी’ अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 10 हजार वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात येणार आहे. चिंच, वड, चाफा, पाम, नारळ, गुलमोहोर, कडुलिंब, पिंपळ, रेन ट्री, करंज, मोहोगनी, जांभूळ अशा विविध प्रकारच्या आणि उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यासाठी चांगली रोपेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील काही झाडांची लागवडही वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.