(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kitchen cleaning Tips : स्वयंपाकघर स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
स्वयंपाक बनवणाऱ्या अनेकांना स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचा कंटाळा येतो. परंतु, आम्ही आज स्वयंपाकघर स्वच्छ आणि निर्जंतुक (Kitchen cleaning Tips) करण्याच्या काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
Kitchen cleaning Tips : स्वयंपाक करणे ही गोष्ट अनेकांसाठी आनंददायी असते. असे म्हटले जाते की, स्वयंपाक करण्यामुळे अनेकांच्या मनावरील तणाव दूर होतो. आपण केलेल्या स्वयंपाकाचे कोणी कौतुक केल्यानंतर तर तो आनंद काही वेगळाच असतो. काहींना वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असते. असे असले तरी स्वयंपाक बनवणाऱ्या अनेकांना स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचा कंटाळा येतो. परंतु, आम्ही आज स्वयंपाकघर स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याच्या काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करण्याच्या आनंदासह स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचाही आनंद देतील. चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघर स्वच्छ करण्याच्या काही खास टिप्स.
शेफ वरूण इनामदार यांनी स्वयंपाकघर स्वच्छ करण्याच्या साध्या आणि सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. इनामदार यांनी सांगितल्यानुसार, "बेकिंगमध्ये वापरण्याव्यतिरिक्त बेकिंग सोडा हा एक उत्कृष्ट डिओडोरायझर आणि क्लिनर आहे. व्हिनेगरमध्ये मिसळल्यास हा सोडा ग्रीसचे डाग पुसण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. या मिश्रणामुळे एक शक्तिशाली आम्ल-आधारित अभिक्रिया निर्माण होते. फरशी स्वच्छ करण्यासाठी आपल्या मॉपच्या पाण्यात हे मिश्रण घाला आणि फरशी घासून घ्या. त्याचे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
स्वयंपाक झाल्यानंतर किचन कट्टा आणि स्वयंपाक घरातील फरशी स्वच्छ केली जाते. परंतु, स्वयंपाक घरातील भिंतींकडे बऱ्याचवेळा लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या भिंती वर्षानुवर्षे तशाच अस्वच्छ राहिलेल्या पाहायला मिळतात. परंतु, स्वयंपाक घरातील भिंती स्वच्छ करण्यासाठीही इनामदार यांनी काही सोप्या टिप्स सांगतिल्या आहेत. स्वयंपाक घरातील भिंती स्वच्छ करण्यासाठी, थोडे कोमट पाणी घ्या, त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि टाईल्स घासून घ्या. लिंबू पाणी आणि व्हिनेगरसह घासल्यास डाग त्वरित निघून जातात. हे मिश्रण एक शक्तिशाली डीग्रीसर म्हणून देखील कार्य करते. आपल्या स्वयंपाकघराला लिंबाचा ताजा वास ते देते आणि तेथील पृष्ठभाग आणि भिंतींना टवटवीत करते.
वरुण इनामदार सांगतात, "तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. आपल्या हातात कितीही वेळ असला तरीही आपली स्वयंपाकघरातील उपकरणे संपूर्ण स्वयंपाकाच्या अवधीत आपल्याला उत्कृष्ट अनुभव देतात आणि स्वयंपाक अधिक चांगला बनवतात. अर्थात ही उपकरणे आपले जीवन सोपे करण्यासाठी असली, तरी त्यांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचा रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, कॉफी मेकर, मिक्सर-ग्राइंडर, ओव्हन ही सर्व उपकरणे तुमचे अन्न साठवतात आणि शिजवतात. त्यांचे मिश्रण करतात आणि त्यामुळे त्या सर्वांमध्ये या अन्नपदार्थांचा वास येत राहतो, चव येत राहते. तुम्ही दोन दिवसांपूर्वी शिजवलेल्या पदार्थांची चव आणि वासही त्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळेच ही उपकरणे चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे आणि नियमितपणे दुर्गंधीमुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचे मिश्रण तुमची उपकरणे स्वच्छ करण्यासाठी खूप चांगले कार्य करते. स्टीलची आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने ती घासा. असे केल्याने अन्न शिजवण्याची उपकरणे अतिशय स्वच्छ होतील.
स्वयंपाक बनवत असताना स्वयंपाक घरात अनेकवेळा थोडी सांडलवंड होत असते. स्वयंपाक घरात पडलेले हे अन्न किंवा काही पदार्थ वेळीच साफ केले नाहीत तर त्यामुळे स्वयंपाक घरात झुरळे आणि किडे होतात. ही झुरळे आपण बनवलेले अन्न दूषित करतात. त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती आजारी पडण्याचाही धोका जास्त असतो. घरात लहान मुले असतील तर अजून जास्तच काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे स्वयंपाक करत असताना सांडलेले अन्न काढून स्वयंपाक घर स्वच्छ केले पाहिजे. "स्वंपाक केल्यानंतर झुरळ मारणारा स्प्रे नियमितपणे वापरा. हा स्प्रे लपलेल्या झुरळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो, " असे इनामदार सांगतात.
स्वयंपाक बनवल्यानंतर स्वयंपाकघराची स्वच्छता आणि आवराआवर जेवण झाल्यानंतर करू, असे आपण करत असतो. जेवण झाल्यानंतर स्वयंपाक घर आणि जेवणाची भांडी स्वच्छ केले तर काही हरकत नाही. परंतु, सुऱ्या, गाळणी आणि खिसणी या गोष्टी जेवण करण्याआधीच स्वच्छ केल्या पाहिजेत. कारण त्यांमध्ये अडकलेले अन्न काही वेळात वाळून जाते आणि हे वाळलेले अन्न काढून टाकण्यासाठी नंतर फार वेळ जातो. त्यामुळे ही तीन उपकरणे स्वयंपाक झाल्यानंतर जेवणाआधीच धुवून टाका.
महत्वाच्या बातम्या