Child Health: पूर्वीपेक्षा सध्याचे पालकत्व अधिक आव्हानात्मक! घरातील तणावपूर्ण वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम? तज्ज्ञ सांगतात...
Child Health: डॉक्टरांच्या मते, पूर्वीच्या तुलनेत सध्या पालकत्व अधिक आव्हानात्मक ठरत आहे. पालकांमधील ताण कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहे.

Child Health: आधुनिक जीवनशैलीबरोबरच वाढलेल्या अपेक्षा, व्यस्त वेळापत्रक आणि काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल न साधता येणे यामुळे पालकत्वाचा ताण वाढत आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आज या लेखाच्या माध्यमातून पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनचे वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ, डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता यांनी पालकांमधील ताण कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहे.
सध्याचे पालकत्व अधिक आव्हानात्मक...
पूर्वीच्या तुलनेत सध्या पालकत्व अधिक आव्हानात्मक ठरत आहे. कामाचा वाढता ताण, अभ्यासाच्या अपेक्षा, वाढता स्क्रीन टाइम आणि वाढत्या स्पर्धा यामुळे बरेच पालक सततच्या तणावाखाली वावरताना दिसून येतात. ते अनेकदा हा तणाव मुलांसमोर लपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, मुलं घरी असलेला हा भावनिक ताण सहजपणे जाणवतात. कालांतराने, सतत पालकत्वाचा ताण मुलाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्य आणि एकूण विकासावर देखील परिणाम करू शकतो. ही वास्तविकता आहे ज्याबद्दल पालकांनी नेहमीच संवेदनशील असणे आणि त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
पालकत्वाचा ताण तुमच्या मुलाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो?
डॉक्टर म्हणतात, हे सर्वज्ञात सत्य आहे की मुलं शांत आणि सुरक्षित वातावरणात वाढायला हवे. मात्र जेव्हा पालक तणावाखाली वावरतात तेव्हा त्यामुळे घरात चिंता, दबाव आणि नैराश्याचे वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात, मुलं असुरक्षित, दबावाखाली राहु लागतात. पालक रागावून, निराश होऊन, ओरडून किंवा मुलाला शारीरिक हिंसाचाराला बळी पाडून त्यांचा ताण व्यक्त करतात. हा ताण वारंवार डोकेदुखी, पोटदुखी, झोप न लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या स्वरूपात दिसून येतो, ज्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात. ते चिडचिडे, आक्रमक किंवा एकाकी होतात. अशी मूलं अनेकदा त्यांच्या पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्यास घाबरतात, जर त्यांनी त्यांच्याशी काहीही चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर पालकांना राग येईल, ते ओरडतील, रागवतील अशी भीती या मुलांमध्ये दिसून येते. काहींना शाळेत लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते किंवा अपयशाची भीती वाटू शकते. लहान मुलांमध्ये ताणतणाव हा अंथरुण ओले करणे किंवा अंगठा चोखणे अशा प्रकारातून दिसून येतो. व्यस्त जीवनशैलीमुळे कुटुंबातील दर्जेदार वेळेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबात भावनिक दुरावा निर्माण होतो. अनियमित दिनचर्या, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढत्या स्क्रीन टाइम मुळे मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
खालील टिप्सचा अवलंब करा
डॉक्टर सांगतात, पालकांनी स्वतःच्या ताणतणावाला तोंड देण्यासाठी त्यावर अचूक मार्ग शोधणे गरजेचे आहे. दिर्घ श्वास घेणे, योगासने करणे आणि ध्यान करणे, थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घेणे किंवा बागकाम करणे, स्वतःची काळजी घेणे किंवा वाचन करणे यासारख्या विश्रांतीच्या तंत्रांचा शोध घ्यावा. मुलांनी दैनंदिन वेळापत्रक जसे की गृहपाठ, खेळणे आणि झोपेच्या, जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत. योग्य दिनचर्येमुळे मुलांना चिंता किंवा ताणतणावाऐवजी सुरक्षित वाटते. खुल्या आणि प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन द्या, ज्यामुळे मुलांना निर्णयाची भीती न बाळगता त्यांच्या भावना व्यक्त करता येतील. पालकांनी मुलांमध्ये स्क्रीन टाइम मर्यादित करावा आणि त्यांना बाहेर खेळण्यास, पुरेशी झोप घेण्यास आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रोत्साहित करावे. पालक आणि मुलांमधील भावनिक संबंध हा त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अतशय गरजेचा आहे; मुलांना अत्यंत आवश्यक असे लक्ष, प्रेम आणि आश्वासन दिल्यास त्यांना सुरक्षित वाटते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
पालकांनी आपल्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवणे, त्यांच्या चिंता समजून घेणे आणि बालपणातील चढ-उतारांना सहजतेने पार करण्यास मदत करणे सुनिश्चित करावे ज्यासाठी ते तयार नसतात. तुमच्या मुलांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करण्यासाठी घरात योग्य वातावरण तयार करणे गरजेचे आहे.
हेही वाचा
Health : सर्दी-खोकला झाल्यावर ब्रँडी किंवा रम पिणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























