तरूणांनो सावधान! अचानक येऊ शकतो हृदयाचा झटका; ही आहेत लक्षणं
अचानक हृदयाचा झटका म्हणजे हार्टअटॅक येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत न होणं, हृदयाच्या धमण्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
मुंबई : आपण अनेकदा ऐकतो की, हृदयविकाराचा झटका हा साठी किंवा सत्तरीनंतरच्या व्यक्तींमध्ये येतो. अशी अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. पण आता विशीतील तरूणाचा मृत्यू हृदयाचा झटका आल्याने झाल्याचं समोर येतं आहे. त्यातच आता तरुणांमध्ये अचानक हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमितवेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहेत.
अचानक हृदयाचा झटका म्हणजे हार्टअटॅक येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत न होणं, हृदयाच्या धमण्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. परंतु, अनेकदा धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हृदयविकाराचा झटका आलेला सुद्धा बऱ्याचदा कळत नाही.
साधारणतः हृदयविकाराचा झटका हा 50 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये येण्याचे धोका अधिक असतो. 2019 मध्ये झालेल्या एका बैठकीत अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डियोजीद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, 40 ते 50 वयोगटातील तरूणांपासून ते चाळीशीच्या आतील तरूणांना अचानक हदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढतेय. याशिवाय गेल्या दहा वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने पीडित 40 वर्षाखालील प्रौढांच्या प्रमाणात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) हा हृदयाचा एक आजार आहे. ज्यात हदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित पावतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात. त्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून चरबी (फॅटी पदार्थ) जमा होतो. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो.
कोरोनरी हार्ट डिसीज या आजाराची लक्षणे
- छातीत अचानक वेदना होणं
- मळमळ जाणवणं
- चक्कर येणं
- घाम येणे
- छाती भरून येणं
- हाय-पाय थंड पडणे
- चालताना त्रास जाणवणं
- दम लागणे, श्वास घेताना अडचण येणे
मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हायपरटेन्शन, हायपर कोलेस्ट्रॉल, अनुवांशिकता यांसारख्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना कोरोनरी हार्ट डिसीज हा विकार होण्याची शक्यता सर्वांधिक असते. हृदयाशी संबंधित हा आजार टाळण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचं आहे. तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यपान करणे टाळावेत. याशिवाय धुम्रपान करत असणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात अधिक काळ राहू नयेत. कारण, यामुळे हृदयाचा आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
सध्याच्या बदलत्या युगात इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वस्तूंकडे तरूणाई आकर्षित होऊ लागली आहे. सगळ्या गोष्टी एका जागीच सहज उपलब्ध होत असल्याने तरूणपिढी आळशी होत चालली आहे. याशिवाय अभ्यासाच्या ताणामुळे कमी वयात मुलं मादक पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहेत. कोकेनचं सेवन करणं हे हृदयविकारचा झटका येण्यामागील मुख्य कारण आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात विशिष्ट प्रकारचे बदल होऊ शकतात. ज्यामुळे तरुणांना अचानक आणि लवकर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )