Spruha Joshi: "नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी तो उभा राहिला ..."; लोकमान्य मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर स्पृहा जोशीने शेअर केली खास पोस्ट
Spruha Joshi: लोकमान्य (Lokmanya) या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर स्पृहानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Spruha Joshi: छोट्या पडद्यावरील लोकमान्य (Lokmanya) या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या लोकमान्य या मालिकेमध्ये अभिनेता क्षितिष दातेने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली. तसेच अभिनेत्री स्पृहा जोशीनं (Spruha Joshi) या लोकमान्य टिळक यांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली. लोकमान्य मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर स्पृहानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
स्पृहानं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका गाण्याचे रेकॉर्डिंग होत आहे, असं दिसत आहे. या व्हिडीओला स्पृहानं कॅप्शन दिलं, गाण्याची गोष्ट , ‘लोकमान्य’ मालिकेसाठी एक गाणं करावं असं आमचा निर्माता अक्षय पाटील याला वाटत होतं. ‘हे गाणं तू लिहिशील का’ असं विचारल्यावर मी अर्थातच आनंदाने तयार झाले. कविता लिहून झालीही. पण गाणं होण्याआधीच, मालिका बंद होत असल्याची बातमी कानावर झाली. तो विषय तिथेच संपला. पण या इतक्या सुंदर, मनाच्या जवळच्या मालिकेची सांगता होताना काहीतरी राहून जातेय असे सारखं वाटत होतं. मी माझा संगीतकार मित्र शुभंकर शेंबेकर ला फोन केला. नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी तो उभा राहिला आणि अक्षरश: दोन दिवसात अप्रतिम चाल त्याने बांधली. क्षितिशच्या एका कॉलवर जयदीप वैद्य हा आमचा मित्र ते गाणं गायला तयार झाला.इतकंच नाही, तर या गाण्यातला तबलासुद्धा जयने वाजवलाय, स्वतःचं रेकॉर्डिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन! शुभंकर आणि जय यांनी या सगळ्यासाठी एकाही पैशाचा मोबदला घेतला नाही. सगळं फक्त आमच्या प्रेमापोटी!
View this post on Instagram
पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'अक्षय ने हे गाणं मी परस्पर रेकॉर्ड करून घेतलं तरीही आमच्या शेवटच्या एपिसोडला लावायचा निर्णय घेतला. हा त्याच्या, अपर्णा ताईच्या मनाचा मोठेपणा आहे. इतकी चांगली माणसं भेटणं हे लोकमान्यांचेच आशिर्वाद!'
'हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहेच. आवडलं असेल, तर अजूनही जरूर जास्तीत जास्त शेअर करा ... या प्रवासाची आता खरी ‘पूर्तता’ झाली असं वाटतंय.' असही स्पृहानं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
स्पृहानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आभाळमाया, अग्निहोत्र, उंच माझा झोका,एका लग्नाची दुसरी गोष्ट,एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमधील स्पृहाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘उंच माझा झोका’ या मालिकेतील स्पृहाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :