Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल' आता मराठीमध्येही, Ajay - Atul असणार परीक्षक
'इंडियन आयडल - मराठी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे 'इंडियन आयडल - मराठी'.
Indian Idol Marathi : सोनी मराठी चॅनल नवनवीन प्रयोग करत असते. मग त्यात मालिकेतील कथानकांचा अभ्यास असो, मालिकांतील कलाकारांची निवड करणे असो वा दिग्दर्शक, निर्मितीसंस्था घेत असलेली मेहनत असो. 'इंडियन आयडल' या हिंदी भाषेतील कार्यक्रमाने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा 'इंडियन आयडल - मराठी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे 'इंडियन आयडल - मराठी'. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'इंडियन आयडल - मराठी' ही सुंवर्णसंधी ठरणार आहे.
'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाचे परीक्षण 'अजय-अतुल' करणार आहेत. संगीतसृष्टीतली ही दिग्गज जोडी या कार्यक्रमाचे परीक्षण करणार असल्याने कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे. पुण्यात नारायण पेठेत काल भित्तीचित्राद्वारे 'अजय-अतुल' परीक्षण करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह दिग्दर्शक अमित फाळके उपस्थित होते.
आपल्या संगीताने 'अजय-अतुल' या जोडीने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कोरलं आहे. आता तर त्यांचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. या जोडीने आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरूवात केली होती. त्यामुळे पुण्यातच 'अजय-अतुल' जोडी 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाच्या परीक्षक भूमिकेत दिसणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच अशाप्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरात या भित्तीचित्रांची चर्चा होताना दिसून येत आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्र पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेत आहे. निखिल खैरनार या कलाकाराने हे भित्तिचित्र काढले आहे.
'अजय-अतुल' या जोडीने आतापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे 'इंडियन आयडल' या मंचाने देखील संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. आता हा मंच मराठीतदेखील आल्याने मराठी सिनेविश्वाला देखील अनेक गुणी कलाकार मिळतील अशी आशा आहे. फ्रीमेन्टल या निर्मितीसंस्थेने 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमासाठी आता सोनी लिव्हवर ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.