(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SP Balasubramaniam Death: उमदा सूर हरपला...! गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन
SP Balasubramaniam Passes Away : प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतातील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
चेन्नई : प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली. कालांतराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होता.
रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. सकाळी मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त होते. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
एसपी बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल.. एसपी बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली ती 90 च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं होतं. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं होतं.
सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांमुळे त्यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.
एसपी यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. यात भारताला त्यांची ओळख पटली ती हमसे है मुकाबला या सिनेमातून. यात त्यांनी प्रभूदेवाच्या भावाची भूमिका केली होती.