‘कुलस्वामिनी’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; प्रेक्षक उत्सुक
कुलस्वामिनी चित्रपटाची कथा अभिजीत जोशी यांनी लिहीली असून जोगेश्वर ढोबळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘या देवी सर्व भूतेषु’... असं म्हणताना आई, पत्नी, बहीण, मुलगी, सखी अशा स्त्रीशी असलेल्या साऱ्या नात्यांमध्ये कुलस्वामिनीच्या वात्सल्याचा लाभ मिळत असतो. घराच्या रक्षणासाठी सदैव दक्ष असणाऱ्या स्त्रीशक्तीचं हे रूप कुलस्वामिनी या आगामी मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.चे एमडी श्री. सुशिलकुमार अग्रवाल यांनी क्लॅप देत नुकताच चित्रपटाच्या मुहूर्ताचा शुभारंभ केला. गायिका नेहा राजपाल यांच्या मधाळ आवाजातील गीतध्वनीमुद्रणाने हा मुहूर्त संपन्न झाला.
कुलस्वामिनीच्या ठायी असलेल्या दया, क्षमा, श्रद्धा, शांती अशा विविध गुणांचा अविष्कार या गीतातून प्रेक्षकांना अनुभवता येईल. आपल्या सगळ्या चुका पोटात घालून मायेचा,वात्सल्याचा वर्षांव करणाऱ्या कुलस्वामिनीचं भक्तीमय गीत आणि कुलस्वामिनी हा चित्रपट प्रेक्षकांसाठी ही तितकाच खास असेल असं गायिका नेहा राजपाल सांगतात. अभिजीत जोशी यांचा संगीतसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे.
कुलस्वामिनी चित्रपटाची कथा अभिजीत जोशी यांनी लिहीली असून जोगेश्वर ढोबळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विलास उजवणे, नेहा बाम, चित्रा देशमुख, अतुल महाले आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली कौटुंबिक धाटणीचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.चे एमडी श्री.सुशिलकुमार अग्रवाल याप्रसंगी म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मीतीसाठी पुढाकार घेतला आहे, जो रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सध्या मनोरंजन उद्योग एका स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात आहे. प्रतिभावान चित्रपट निर्माते आणि कलाकारांना नवीन दृष्टीकोन देण्यासोबतच जागतिक प्रेक्षकांचे स्वागत करण्याचे प्रयत्न आम्ही करू इच्छित आहोत.