उडता पंजाब! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा भाऊ अडकला हाय प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात; फरार आरोपीचा शोध सुरू
Rakul Preet Singhs Brother Named in High-Profile Drug Case: हैदराबादमधील हाय प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अडकला अमन प्रीत सिंग. मसाब टँक परिसरात कोकेन अन् एमडीएमए जप्त.

Rakul Preet Singhs Brother: तेलुगू आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करणारी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाच्या अडचणीत वाढ होणार आहे. अमन प्रीत सिंग याच्यावर हैदराबाद पोलिसांनी शहरातील मसाब टँक परिसरातील एका हाय प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. अमन सध्या फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अमनला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस येताच सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी हे प्रकरण उघडकीस आलं. मसाब टँक परिसरातील चाचा नेहरू पार्कजवळ पोलिसांकडून एक विशेष कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोकेन आणि एमडीएमए जप्त करण्यात आले. प्रकरण समोर येताच पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी दोन संशयितांना ड्रग्ज बाळगणे तसेच विक्री करणे या आरोपाखाली अटक केली आहे. मलकापेट येथील रिअल इस्टेट ब्रोकर नितीन सिंघानिया (वय वर्ष 35) आणि ट्रूप बाजार येथील व्यापारी श्रणिक सिंघवी (वय वर्ष 36) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ड्रग्ज डिलिव्हरीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्लान आखला. तसेच पार्किंग क्षेत्राजवळ एका राखाडी रंगाच्या चारचाकीला थांबवलं. पोलिसांनी चारचाकीची झडती घेतली. झडतीदरम्यान, अधिकाऱ्यांना डॅशबॉर्डमध्ये लपवलेले 46.7 ग्रॅम कोकन आणि 11.5 ग्रॅम एमडीएमए आढळले. क्लू टीमने जप्त केलेल्या पदार्थांची घटनास्थळी पडताळणी केली. चौकशीदरम्यान, अटक केलेल्या आरोपींनी सांगितले की, त्यांना नायदेरियन सप्लायरकडून कोकेन आणि एमड़ीएमए मिळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज आफ्रिकन कुरिअरद्वारे हैदराबादला पोहोचवली जात होती. तसेच मर्यादित ग्राहकांना पाठवली जात होती.
View this post on Instagram
24 डिसेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात दोन आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. पुढील चौकशीत अमन प्रीत सिंगसह चार कथित ड्रग्ज वापरकर्त्यांची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन प्रीत सिंगला सायराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. डीसीपी चौधरी श्रीनिवास म्हणाले की, "चौकशीदरम्यान, झालेल्या खुलाशांच्या आधारे, अमन प्रीत सिंग याची या प्रकरणातील एक ग्राहक म्हणून ओळख पटली आहे. आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी आणि अटक करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत", अशी माहिती पोलिसांनी दिली.























