![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! #MahaCovid
सध्या राज्यासह देशभरात कोरोनामुळे मोठं संकट निर्माण झालंय, ठिकठिकाणी ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झालाय, अशात केवळ रुग्णालयंच नाहीत तर अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कुठे काय सुविधा आहेत, ही माहिती आणण्याचा प्रयत्न केला. यात मराठी कलाकारही मागे राहिले नाहीत, कलाकारांनी आपल्या सोशल माध्यमांवर एक नवी मोहीम सुरू केली आहे.
![Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! #MahaCovid Marathi celebrities social media campaign for covid patients Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! #MahaCovid](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/25/d77ac72fa42cf0d66db9d1b548d47fed_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट होताना दिसते आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसलेले दिसतात. तर काही ठिकाणी ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. अर्थात यात बऱ्याचदा माहिती नसणंही कारणीभूत ठरू शकतं. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जी महत्वाची रुग्णालयं आहेत तिथे बेड नसतील तर पुढे काय असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडतो. पण अशावेळी मुंबई आणि उपनगरात जी छोटी रुग्णालयं आहेत तिथे काही बेड उपलब्ध असू शकतात. पण त्याची माहिती वेळीच मिळते असं नाही. ही बाब लक्षात घेऊन मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर एक नवी मोहीम सुरू केली आहे.
या नव्या मोहिमेचं नाव आहे महाकोव्हिड. महा म्हणजे महाराष्ट्र या अर्थाने आणि कोव्हिड अर्थातच कोरोना. सध्या ट्विटरवर #mahacovid हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. कोरोना संदर्भात बेड, प्लाझ्मा, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सह कोणत्याही गोष्टी मिळण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कुणाला अडचण येत असेल तर आपली गरज #mahacovid या हॅशटॅगसह जोडायला विसरू नका. असं हे आवाहन आहे.
याबद्दल बोलताना आपल्या इन्स्टावर स्वप्नील जोशीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आता यापुढचे काही दिवस तो आपल्या सोशल मीडियावर फोटो वा इतर बातम्या पोस्ट न करता केवळ कोव्हिडबाबतची सकारात्मक बातमी वा त्याबद्दलच्या मदतीसंबंधीच्या बातम्या पोस्ट करणार आहे असं त्यानं सांगितलं आहे. त्याने हे ट्विटही केलं आहे. त्याचाच भाग म्हणून महाकोव्हिड हा हॅशटॅग वापरून जेवढी माहिती लोकांपर्यंत पोचवता येईल ती तो पोचवण्याचं काम करतो आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी हे आवाहन केलं आहे. यात स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, समीर विद्वांस, हेमंत ढोमे आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. कलाकारांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसादही मिळू लागला आहे. स्वप्नील आणि सोनालीला टॅग कर स्थलपुराण, त्रिज्या या चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडिकरने बेड असलेल्या रुग्णालयाचा पत्ता दिला आहे. त्याला या कलाकारांनी लाईक केलं आहे. स्वप्नीलने यात वारंवार हा हॅशटॅग प्रमोट केला आहे. त्याला प्रतिसादही मिळू लागला आहे. जिथे जी गरज असेल ती पुन्हा एकदा स्वप्नील रिट्विट करून सांगताना दिसतो. शिवाय काही उपलब्ध असलेल्या गोष्टी दिसल्या तर त्याही अधोरेखित होताना दिसू लागलं आहे.
आनंदी गोपाळ, डबलसीट आदी चित्रपटांचा दिग्दर्शक समीर विद्वांस यानेही कोव्हिडसंदर्भातल्या काही गोष्टी पोस्ट केल्या आहेत. यात आता 18 वर्षावरील नागरिकांना कोव्हिडची लस मोफत मिळणार असल्याच्या बातमीला रिट्विट करताना समीर म्हणतो, की मला ही लस विकत घेणं परवडणारं आहे. अशा लोकांनी ही लस मोफत न घेता विकत घ्यावी जेणेकरून त्यातला पैसा कोव्हिडच्या इतर कारणासाठी वापरता येईल. असे अनेक कलाकार आपआपल्या परिने कोव्हिडच्या स्थितीवर मात करण्यासाठी पुढे सरसावताना दिसू लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)