चित्रपटात सोशल मिडिया Influencer चा वाढता ट्रेंड, मोठ्या पडद्यावरची व्यावसायिक गणिते मात्र वेगळीच!
प्राजक्ता कोळी, भुवन बम, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, अथर्व सुदामे, कुशा कपिला असे अनेक जण त्यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे टीव्हीमधील मालिकांमध्ये तर बॉलीवूडमध्येही दिसू लागले आहेत.
Social Media Influencers: सोशल मीडियावर कितीतरी क्रियेटर्स आहेत ज्यांच्या मजेदार बोलण्याने आणि विनोदी वागण्या बोलण्याच्या पद्धतीने आपण त्यांना सहजपणे फॉलो करून टाकतो. भरपूर फॉलोवर्स आणि लोकांचे प्रेम यामुळे आता अनेक सोशल मीडिया स्टार मोठ्या पडद्यावर दिसू लागले आहेत. सोशल मीडियावर ट्रेंडिंग कलाकृतीत दिसणाऱ्या क्रियेटर्सला मालिकांमध्ये तर थेट सिनेमातही रोल मिळू लागले आहेत. लाखोंच्या घरात सोशल मीडियावर लोकप्रियता असल्यानं आपल्या मालिकेत किंवा चित्रपटात त्यांना घेतल्याने होणारा फायदा लक्षात आल्याने इनफ्लुएन्सर्सला चित्रपटात मागणी अधिक असल्याचं दिसत आहे. क्रिएटर्सला चित्रपटात घेणं हे एका दृष्टीनं फायद्याचं कसं ठरतं पाहूया..
प्राजक्ता कोळी, भुवन बम, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, अथर्व सुदामे, कुशा कपिला असे अनेक जण त्यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे टीव्हीमधील मालिकांमध्ये तर बॉलीवूडमध्येही दिसू लागले आहेत.
क्रियेटर्सने कमावली स्वतंत्र ओळख
सोशल मीडिया इन्फ्लुयन्सरला आपल्या सिनेमात किंवा मालिकेत घेतलं तर त्याचे दोघांनाही फायदे होत असल्याचं दिसत असल्यानं हा ट्रेंड आता चांगलाच रुळला आहे. अलीकडच्या काळात केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर न राहता अनेक क्रियेटर्सने स्वतंत्र कलाकृती करत लेखन व दिग्दर्शनातही पाऊल टाकले आहे. उदाहरणार्थ भुवन बम याने निर्मिती लेखन आणि दिग्दर्शन केलेली ताजा खबर ही वेब सिरीज. किंवा नुकतेच बिग बॉस मराठीच्या घरात झळकलेली कोकण हार्टेड गर्ल!
सोशल मीडिया स्टारला चित्रपटात घेण्याचाही फायदा
सोशल मीडिया क्रिएटरला आपल्या चित्रपटात घेण्याचा त्या निर्मात्याला ही फायदा होत असल्याचा दिसतं. एखाद्या कलाकृतीत फक्त त्या सोशल इन्फ्लुएन्सरच्या असण्यानं फायदा होत असल्याने आता सिनेमांमध्ये क्रियेटर्स दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्यक्ष क्रिएटर्सला कलाकृतीत घेतलं तर त्यांच्या रिल्समधूनच प्रमोशन कसं होईल यावर भर देत असल्याचं दिसून येतं. मग तो कलाकार त्या कलाकृतीत असो वा नसो. केवळ कोलॅब्रेशन करून पेड प्रमोशन केले जातात. अनेकदा निर्मातेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला बोलवून त्या कलाकृतीची प्रसिद्धी करण्यावर भर देत असल्याचा सांगण्यात येतं.
सोशल मीडिया क्रियेटर्सच्या फॉलोवर्सचा गेम
सोशल मीडियामध्ये हे नावाजलेले चेहरे असल्याने त्याचा एखाद्या मालिकेला किंवा त्या कलाकृतीला चांगलाच फायदाच होतो. ही व्यक्ती लोकप्रिय असल्याने मोठ्या संख्येला आपल्या कलाकृतीकडे वळवता येते. सिनेमा किंवा मालिका किंवा कोणतेही कलाकृती कशी प्रमोट करायची याची गणित त्या क्रिएटरला घालून दिलेली असतात. कोणती रिल कधी पोस्ट करायची यापासून प्रमोशन दरम्यान किती रिल्स असायला हव्यात हेही बहुतांशवेळा निर्मात्यांनीच सांगितलेलं असतं. या रिल्सनुसार, त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीनुसार त्या क्रिएटरचं मानधन ठरवलं जातं.