Dilip Kumar : 'लखलखता तारा निखळला', दिलीप कुमारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते भावूक
Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते भावूक झाले आहेत.

Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
दिलीप कुमारांचं जाणं सांस्कृतिक जगतासाठी एक क्षती - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसंच दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना फोनवरून पंतप्रधानांनी धीर दिला आहे. सिनेसृष्टीतील एक आख्यायिका म्हणून दिलीपकुमारजी यांची आठवण कायम राहील. त्यांना अद्वितीय प्रतिभेचा आशीर्वाद मिळाला होता, त्यामुळेच अनेक पिढ्यांचे दर्शक मंत्रमुग्ध झाले. त्यांचं निघून जाणं आपल्या सांस्कृतिक जगतासाठी एक क्षती आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती संवेदना, श्रद्धांजली', असं आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
'माझ्या सद्भावना दिलीप कुमार यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, चाहत्यांसोबत आहेत. पुढील अनेक पिढ्यांमध्ये भारतीय सिनेमासाठी दिलेलं त्यांचं योगदान लक्षात ठेवलं जाईल', असं म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वडीलधाऱ्या स्नेही व्यक्तिला मुकलो-शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, मी वडीलधाऱ्या स्नेही व्यक्तिला मुकलो. अखंड सेवा करण्याचे काम त्यांनी केलं. त्यांना मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. कुटुंबियांना धीर देण्यासाठी साथ देऊ, असंही पवारांनी म्हटलं आहे.
रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामरच राहील. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
"ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा 'ट्रॅजेडीकिंग' काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं 'दिलीपकुमार' बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते, पद्मविभूषण दिलीपकुमार यांचं स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
दिलीपकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील-सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडच नाही तर जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात देशमुख यांनी म्हटले आहे की, १९४४ मध्ये बॉम्बे टॉकिजची निर्मिती असलेल्या 'ज्वार भाटा' चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले, यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्या दर्जेदार अभिनयातून विविध अविस्मरणीय चित्रपट केले, त्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बेस्ट ॲक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचे रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे.अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमुना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिलीपकुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीदेखील केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
