'छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो'; ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय
Chinmay Mandlekar Viral Video : अभिनेता चिन्मय मांडलेकर याने ट्रोलिंगनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Chinmay Mandlekar Viral Video : अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गोष्टीमुळे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवलं आहे. त्यावरुन चिन्मय बराच ट्रोल झालाय. नुकतच त्याची बायको नेहा जोशी मांडलेकर (Neha Joshi Mandlekar) हीने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सना चोख उत्तर देखील दिलं होतं. इतकच नव्हे तर चिन्मयला काहींना पाकिस्तान किंवा आफगणिस्तानमध्ये जाण्याचा देखील सल्ला दिला होता. त्यावरुन देखील नेहाने चांगलेच खडेबोल सुनावले.
पण नेहाच्या या व्हिडिओनंतर आता चिन्मयने देखल त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. चिन्मयने हा व्हिडिओ शेअर करत एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. दरम्यान चिन्मयने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो चांगलाच ट्रोल झाला. दरम्यान आता यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचा निर्णय देखील यावेळी त्याने घेतला आहे.
चिन्मयने व्हिडिओमध्ये काय म्हटलं?
हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्या कमी झाल्या का तर नाही. उलट आता त्या जास्त वाढल्या आहेत. आता तर लोकं त्याच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर कमेंट्स करतायत. एक व्यक्ती म्हणून त्याचा मला त्रास होतोय. मी अभिनेता आहे; पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्याही पद्धतीचा जर मानसिक त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी मी बांधील नाहीय. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं, नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता. पण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक माध्यमांवरून मी यापूर्वी बोललो आहे. जर कोणाला हे जाणून घेण्याची इच्छा असेल, तर त्यांनी ते व्हिडीओज जाऊन पाहावेत. काल नेहानंसुद्धा जेव्हा व्हिडीओ बनवला तेव्हा त्याची कारणमीमांसा केली म्हणून ती करण्याकरिता मी आता वेळ वाया घालवणार नाही.”
View this post on Instagram
मी शिवरायांची भूमिका करणार नाही - चिन्मय मांडलेकर
पुढे चिन्मयने म्हटलं की, 'मला इतकंच सांगायचंय. मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो. मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का?, असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण, माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झालाय. आज तो 11 वर्षांचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं. हे आता होतंय. त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, तर अमराठी लोकांचंसुद्धा प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल, तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की, इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. कारण- मी करीत असलेलं काम, मी करीत असलेली भूमिका यांचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल, तर एक वडील म्हणून, नवरा म्हणून व एक कुटुंबप्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे.'
'आपल्या श्रद्धेचं स्पष्टीकरण मी लोकांना का द्यावं?'
'मला याचं वाईट वाटतंय का? तर हो मला खूप वाईट वाटतंय. कारण- माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे. त्याच भक्ती आणि श्रद्धेची एक अभिव्यक्ती म्हणजे माझी भूमिका होती आणि वैयक्तिक आयुष्यात खूपशा अशा गोष्टी आहेत. अगदी माझ्या गाडीतसुद्धा जिथे लोक साधारणपणे गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे आणि हा दिखावा नाही आहे; हे प्रेम आहे. ही श्रद्धा आहे. पण, आपल्या श्रद्धेचं स्पष्टीकरण मी लोकांना का द्यावं? आणि लोकांनी तरी ते का ऐकावं. त्यांना काय दिसतं, तर मुलाचं नाव जहांगीर ठेवलं.'
'महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं. पण, जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या ११ वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की, इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही. नमस्कार, असं म्हणत चिन्मयने त्याच्या करिअरमधील एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.