अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डेनंतर भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेची जोडी गाजवणार मोठा पडदा
झी स्टुडिओजचा लवकरच 'पांडू' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात छोट्या पडद्यावरची भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेची जोडी दिसून येणार आहे.
PANDU MOVIE : 'पांडू' सिनेमाची घोषणा झाल्यापासून 'पांडू' नेमकं कोण साकारणार, अशा चर्चा होत होत्या. आज 'पांडू' सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने 'पांडू' आणि 'महादू'ची जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. सिनेमात भाऊ कदम 'पांडू' च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके 'महादू'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.
काळू-बाळूपासून ते अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत विनोदवीरांच्या अनेक जोड्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आजच्या घडीला विनोदातील हुकुमी एक्के म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीचं. या चित्रपटात 'पांडू' ही मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत भाऊ कदम. भूमिकेबद्दल भाऊ म्हणाले,"सध्याच्या या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाहीये. 'पांडू' प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे."
Bhai Ka Birthday Song Teaser: Antim सिनेमातील Bhai Ka Birthday गाण्याचा टीजर प्रदर्शित, Salman Khan आणि Aayush Sharma आमने-सामने
तुफान एनर्जीचा बादशाहा कुशल म्हणाला,"मी या चित्रपटात 'महादू' हवालदाराची भूमिका साकारत आहे. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हा चित्रपट कायम ठेवेल यात शंकाच नाही. गेल्या २१ वर्षात आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेली आहे. तीच मैत्री आता पांडू आणि महादूच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. 'पांडू'सारखा सिनेमा प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे".
'पांडू' सिनेमाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तर चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे. मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला 'पांडू' हा येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तेव्हा लॉकडाऊनचा ताण अनलॉक करण्यासाठी या 'पांडू'ची भेट घ्यायलाच हवी.