एक्स्प्लोर
संदीप कौर ते बॉम्ब शेल बँडिट, खऱ्या ‘सिमरन’चा थरारक प्रवास
संदीप कौर... वयाच्या पाचव्या वर्षी पालकांसोबत ती अमेरिकेत आली आणि तिथलीच होऊन गेली. पुढे जाऊन या संदीपने जे काही कारनामे केले ते पाहून तुम्ही सुद्धा तोंडात बोटं घालाल.
मुंबई : 21 वर्षांची तरुणी... जुगारात हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी थेट बँकांवर दरोडा टाकणारी...तुम्ही म्हणाला सिनेमाची गोष्ट म्हणून हे ठीक आहे. पण हे तेवढ्यापुरतंच मर्यादित नाही. 'सिमरन' हा फक्त एक सिनेमा नाही तर संदीप कौर नावाच्या तरुणीची आयुष्याची ही कथा आहे.
संदीप कौर... वयाच्या पाचव्या वर्षी पालकांसोबत ती अमेरिकेत आली आणि तिथलीच होऊन गेली. पुढे जाऊन या संदीपने जे काही कारनामे केले ते पाहून तुम्ही सुद्धा तोंडात बोटं घालाल.
संदीपचे वडील अमेरिकेत टॅक्सी चालवायचे. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. जेव्हा तिची आई आजारी पडली तेव्हा तिची काळजी घेण्याची जबाबदारी संदीपवर आली. आईला सांभाळतानाच नर्सिंगचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग तिला मिळालं आणि त्यासोबत महिना 6000 डॉलर्सची नोकरीही तिच्याकडे चालून आली.
2008 हे वर्ष जगासाठी वाईट होतं. कारण त्यावेळी भांडवली बाजारात भीषण मंदी आली होती. पण हिच मंदी संदीपसाठी मात्र सुवर्णसंधी ठरली. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. अगदी कवडीमोल भावात ते उपलब्ध होते. नेमका त्याच गोष्टीचा फायदा संदीपने उचलला.
नर्सिंगच्या नोकरीतून साठवलेले सगळे पैसे तिने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले. मंदीचा काळ जेव्हा सरला तेव्हा त्या शेअर्सनी तिला 2 लाख डॉलर्स मिळवून दिले.
एवढी मोठी रक्कम हातात आल्यानंतर संदीपचं आयुष्यच बदलून गेलं. पार्ट्या आणि छानचौकीत जगायची तिला सवय लागली. त्याहीपुढे जाऊन तिने जुगार खेळायला सुरुवात केली. निमित्त ठरली तिची बर्थ डे पार्टी.
बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने पहिल्यांदाच ती लास वेगासला गेली आणि जुगाराच्या फंदात अडकली. आधी नशिबाचे फासे तिच्या बाजूने पडले पण नंतर सगळंच बिघडत गेलं.
कमावलेले सगळे पैसे संदीप गमावून बसली. एवढंच नाही तर उसने घेतलेले 20,000 डॉलर्सही तिच्या हातून निसटून गेले.
जेव्हा ते पैसे परत मिळवण्यासाठी देणेकऱ्यांच्या धमक्या येऊ लागल्या तेव्हा संदीपने एक निर्णय घेतला, थेट बँक लुटण्याचा... इंटरनेटवरुन माहिती मिळवली आणि पहिला डाका टाकला तो बँक ऑफ वेस्टवर.
या दरोड्यातून तिला तब्बल 21,000 डॉलर्स मिळाले. यासाठी तिने एक साधा फॉर्म्युला वापरला. वेष बदलून कॅशियरकडे जायचं आणि आपल्याजवळ बॉम्ब असल्याचं सांगून धमकवायचं आणि मिळतील तेवढे पैसे पदरात पाडून घ्यायचे अशी तिची स्टाईल होती.
तिच्या या स्टाईलमुळे तिला 'बॉम्ब शेल बँडिट' असं नाव पडलं. अशा पद्धतीने तिने चार दरोडे टाकले.
2014 मध्ये जवळपास दोन महिने दरोड्यांचं हे सत्र सुरु होतं. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आणि स्पष्ट फोटो असूनसुद्धा संदीपला पकडण्यात यश येत नव्हतं.
अखेर पाचव्या दरोड्याच्या प्रयत्नात असताना संदीप पकडली गेली. त्यासाठी पोलिस आणि तिच्यामध्ये चेसिंग रेसही रंगली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर संदीप पोलिसांच्या जाळ्यात आली.
संदीप कौरचा हाच थरारक प्रवास 'सिमरन' सिनेमात मांडण्यात आला आहे. गंमत म्हणजे यासाठी संदीप कौरने निर्मात्यांकडून 50,000 डॉलर्स घेतले आहेत. पण सध्यातरी ती तुरुगांतच आहे. तिने केलेल्या करामतीसांठीची शिक्षा ती भोगत आहे. अजून तीन वर्षांनी जेव्हा ती बाहेर पडेल तेव्हा हे गुन्हेगारी जगापासून ती दूर गेली असेल अशी आशा करायला हरकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement