यवतमाळच्या मातीत तयार झाला ‘शोले’; 'डाकू डब्बल सिंह'ची कोरोनाबाबत जनजागृती
कोरोनाच्या एकूणच जनजागृतीसाठी हा लघुपट निर्माण केला असुन हा लघुपट जास्तीत लोकांनी पहावा आणि कोरोनापासून कसा स्वतःचा आणि कुटूंबाचा बचाव करू शकतो हे लक्षात घेऊन कार्य करावे असे आवाहन निर्माता आनंद कसंबे यांनी केले आहे.
यवतमाळ : 1975 साली आलेल्या शोले चित्रपटानेप्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविलं. या चित्रपटाचे संवाद, या चित्रपटातील दृष्य, किंबहुना संपूर्ण कथानक आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करुन आहे. त्याच शोले चित्रपटातील एका प्रसंगावर आधारीत एक लघुपट यवतमाळच्या मातीत सकारला आहे. ज्याच नाव आहे ‘‘डाकू डब्बल सिंह झाला अकल सिंह’’ !
शोले चित्रपट 1975 साली निर्माण झाला होता, त्या चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटक राज्यातील मंगलोर शहरापासून 275 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामपुरम गावाजवळ संपन्न झाले होते. मात्र ‘‘डब्बल सिंह झाला अकल सिंहचे’’ चित्रीकरण यवतमाळपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत झाले होते. शोले चित्रपटातील गब्बर सिंह, हा त्याच्या तीन साथीदारांना रामगडला लुटमार करण्यासाठी पाठवतो. मात्र ते काही कारणाने रिकाम्या हाताने परत येतात.तेव्हा गब्बर सिंह त्यांच्यावर खुप चिडतो, आणि त्या तिघांना ‘‘इसकी सजा मिलेगी जरुर मिलेगी’’ असा दम देतो, हे दृष्य प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आजही घर करुन आहे . याच दृष्यावर आधारीत अत्यंत चपखल बसणारा यवतमाळ चा शोले एक लघुपट यवतमाळ सारख्या ग्रामीण भागात तयार झाला आहे. या लघुपटाचे नाव आहे ‘‘डाकू डब्बल सिंह , झाला अकल सिंह’’ ! शोलेतील डाकू गब्बर सिंहचे व-हाडी स्वरुप असलेला हा डब्बल सिंह , एका भिषण संकटापासून वाचण्यासाठी तुमची आमची जनजागृती करीत आहे आणि हे संकट म्हणजे संपूर्ण जग सोसत असलेले कोरोनाचे संकट होय.
या लघुपटाचे निर्माता दिग्दर्शक तथा लेखक आनंद कसंबे आहेत. आनंद कसंबे यांनी यासाठी एक साजेशी पटकथा लिहीली आणि त्या कथेला समर्पक असे लोकशन शोधल. याचबरोबर प्रत्येक पात्राला न्याय देवू शकतील असे कलावंतही शोधले. हे कलावंत ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील असुन, काही तर झोपडपट्टीत राहणारे आहेत. यातील एक कलावंत सुधाकर धोंगडे (प्लंबर) नळ दुरुस्तीचे काम करणारे आहेत. तर जनार्दन राठोड हे शेतकरी आहेत. या कलावंतांनी सहकलावंत म्हणून आपल्या भूमिका उत्तमरित्या पार पाडल्या आहेत. तर यातील डाकू डब्बल सींगची भूमिका पूर पाडणारे कलावंत के.गणेशकुमार हे पुसद सारख्या ग्रामीण भागातुन आलेले आहेत. त्यांनी गब्बर सिंह अर्थात डब्बल सिंह अतिशय दमदारपणे साकारला आहे. संपुर्ण कथानक त्यांचेभोवती फिरते. त्यांची संवाद फेक असो की चेह-यावरचे हावभाव असो के.गणेशकुमार यांनी अतिशय ताकतीने ही भूमिका वठवली आहे. यातील कालीयाची भूमिका गजानन वानखडे या यवतमाळ येथील झोपडपट्टीत राहणा-या कलावंताने अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. सांभाची भूमिका घनशाम नगराळे या कलावंताने केली असुन ते सामाजिक कार्यकर्ते म्हणुन परिचीत आहेत. कोरोनाबाबत जनजागृती करण्याची इच्छा असलेले प्रशांत बनगीनवार, विलास पकडे, पंडीत वानखडे, प्रशांत खोरगडे , वसंत उपगनलावार, पवन भारसकर, प्रमोद पेंदोर ,रुपेश रामटेके या कलावंतांनी सुध्दा आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे केल्या आहेत.
या लघुपटाचे चित्रिकरण युवा छायाचित्रकार करण पेनोरे यांनी केले आहे. विशेष म्हणजे करणने तंत्रनिकेतन ,मध्ये शिकत असतांनाच त्याला चित्रपटाच्या शुटींगची आणि संकलनाची आवड निर्माण झाली , मात्र त्याच्या घरची परिस्थीती बेताची असल्यामुळे तो या कोर्ससाठी साडेतीन लाख रुपये शुल्क देऊ शकला नाही. मात्र तो शांत न बसता , त्याने हे संपुर्ण ज्ञान गुगलला गुरु मानत युटयुबच्या माध्यमातुन आत्मसात केले. विशेष म्हणजे नागपूर येथील ज्या संस्थेने त्याला या कोर्ससाठी साडेतीन लाख रुपये मागितले होते, तीच संस्था आता करणाला गेस्ट लेक्चरसाठी बोलावत आहे. महत्वाच म्हणजे या चित्रपटामध्ये काम केलेल्या कलावंतांनी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नाही. कारण , या सर्वांनी एकदिलाने एकत्र येत आपण कोरोना जनजागृती साठी व्यक्तीगतरित्या मी काय योगदान देऊ शकतो, अशा उदात्त भावनेतुन हा लघुपट साकारला आहे.
यासाठी लागणारी वेशभुषा किंवा रंगभूषेचा खर्च निर्माता दिग्दर्शक आनंद कसंबे यांनी स्वत: केला आहे. या लघुपटामध्ये बंदुकीचा आवाज काढणे असो की पाश्र्वसंगीत असो , करण पेनोरेने हे काम अतिशय साजेसं केलेल आहे. खेळण्यातील बंदुकीचा वापर करुन ती हुबेहुब दाखविण्यात संकलक करण पेनोरे नक्कीच यशश्वी झाल्याचे दिसत आहे. मुंबईच्या धर्तीवर , यवतमाळच्या मातीत तयार झालेला हा शोले जनजागृती लघुपट तांत्रिक दृष्टयाही यशश्वी झाल्याचे, दिसुन येत आहे. विशेष म्हणजे निर्माता दिग्दर्शक आनंद कसंबे यांनी ‘‘डाकू डब्बल सिंह’’ आपल्या समाज माध्यमावरील ‘‘आनंदयात्रा’’ या मालिकेमध्ये नुकताच सोशल माध्यमावर प्रसारीत केला आहे.त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या काळात लोकांच्या निखळ मनोरंजानासाठी आनंद कसबे यांनी ‘‘आनंदयात्रा’’ ही हास्यमालीका निर्माण केली आहे. आतापर्यंत हा लघुपट हजारो लोकांनी पाहीला असुन अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या लघुपटाचे निर्माता आनंद कसंबे यांना, कोरोनाच्या जनजागृतीसाठी आपण काय करु शकतो , असा विचार आला तेव्हा त्यांना शोले चित्रपटातील एक प्रसंग आठवला आणि तो म्हणजे गब्बर सिंह कालीयाची झाडाझडती घेतो तो प्रसंग! या प्रसंगावर आधारीत या डाकू डब्बल सिंहची पटकथा लिहीली.
विशेष म्हणजे शोले चित्रपटातील जय म्हणजेच अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. ही घटना लक्षात ठेवून डाकू डब्बल सिंह मध्ये ही घटना कालीया डब्बल सिंहला सांगतो की, तुम्हाला पकडण्यासाठी आलेल्या जयलाबी कोरोना झाला ,तुम्हाला तर पाचपंचविस गावातले लोकच घाबरतात मात्र या कोरानाला संपुर्ण जग घाबरत आहे. हे ऐकताच डब्बल सिंहची चांगलीच घाबरगुंडी होते.
कोरोनाच्या एकूणच जनजागृतीसाठी हा लघुपट निर्माण केला असुन हा लघुपट जास्तीत लोकांनी पहावा आणि कोरोनापासून कसा स्वतःचा आणि कुटूंबाचा बचाव करू शकतो हे लक्षात घेऊन कार्य करावे असे आवाहन निर्माता आनंद कसंबे यांनी केले आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांनी यात मनापासून काम केल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. एकूणच यवतमाळच्या मातीत तयार झालेला हा लघुपट निखळ मनोरंजन सोबतच जनतेची जनजागृती करतोय.