एक्स्प्लोर
केदारनाथ.. न झालेला अभिषेक!
आणखी काहीतरी सिनेमात असायला हवं होतं असं वाटत राहतंं. या सगळ्यात भाव खाऊन जाते ती सारा. तिचं इंड्स्ट्रीत येणं आश्वासक आहे. एकूणात, या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये आपण देतो आहोत दोन स्टार्स.

खरंतर अभिषेक कपूर हा संवेदनशील दिग्दर्शक आहे. आपल्याला काय मांडायचं आहे याची त्याला पुरेपूर कल्पना असते. म्हणूनच त्याच्या केदारनाथबद्दल उत्सुकता होती. सिनेमाचा ट्रेलर आला आणि ती उत्सुकता आणखी वाढली. कारण या ट्रेलरमध्ये एक प्रेमकहाणी दिसत होती. शिवाय, त्यात केदारनाथला आलेला प्रलयही दिसत होता. काहीतरी चकित करणारं आपण पाहणार आहोत, असं वाटत होतं. पण यावेळी थोडा घोळ झालाय. त्या घोळाबद्दल सविस्तर सांगेन, पण सगळ्यांना उत्सुकता होती ती सारा अली खानची. श्रीदेवीच्या मुलीनंतर सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती सैफ आणि अमृताच्या मुलीची. तर आवर्जून सांगण्यासारखी बाब अशी, की साराचं यातलं काम खूपच आश्वासक झालं आहे. शिवाय बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेले नितीश भारद्वाजही तितकेच मनात ठसतात.
कलाकारांच्या कामाची दखल आपण घेऊया. सुशांतसिंगनेही मन्सूर रंगवताना भक्तांना पाठीवरून शिखरावर नेणाऱ्याची भूमिका चोख केली आहे. त्यासाठी त्याने भरपूर मेहनतही घेतली आहे. कारण, तो सगळा व्यवहार करताना कुठेही नवखेपणा आलेला दिसत नाही. हा सगळा भाग एकिकडे. पण यावेळी मात्र पटकथा मांडताना आपल्याला नेमकं काय मांडायचंय यात त्याचा उडालेला गोंधळ सिनेमा पाहताना जाणवतो.
ही गोष्ट मन्सूर आणि मंदाकिनीची आहे. मंदाकिनी हिंदू पंडिताची मुलगी तर मन्सूर हा वाटाड्या. मंदाकिनी मनमौजी आहे. तिचं लग्न तिच्या मनाविरूद्ध केदारनाथच्याच एका उच्चवर्णीय हिंदू मुलाशी ठरलेलं आहे. पण मंदाकिनीला तो मान्य नाही. याचवेळी तिची आणि मन्सूरची भेट होते. त्यानंतर दोघेही प्रेमात पडतात. मग हिंदू विरूद्ध मुस्लीम असा संघर्ष गावात पेटू लागतो. पुढे त्यांच्या प्रेमाचं काय होतं.. ही कथा कोणत्या वळणावर असताना पुराचा प्रलय येतो अशा सगळ्या गोष्टी या सिनेमात मांडण्यात आल्या आहेत.
जर या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रीत केलं, तर हिंदू मुस्लीम प्रेमकहाण्या आपण यापुर्वीही पाहिल्या आहेत. केदारनाथाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते त्यामुळे व्हिज्युअली ट्रीट मिळते. पण कथा म्हणून या प्रेमकहाणीत फार चढउतार नाहीत. मनाला भावतील असे संवाद नाहीत. सिनेमाच्या शेवटी प्रलय येतो. तो येऊन गेल्यावर मध्येच केदारनाथ इथे आलेल्या पुराचे खरी फुटेजं वापरण्यात आली आहेत. त्यात किती लोक मृत्युमुखी पडले, किती लोक हरवले, सैन्याने किती लोकांना वाचवलं ही सगळी माहिती अचानक समोर येते आणि पुन्हा मूळ सिनेमा सुरू होतो. तीन वर्षांनंतर... असं सांगत एक सीन होतो आणि सिनेमा संपतो.
या सगळ्या प्रकारामुळे हा सिनेमा नेमका प्रेमकथेवर आहे की प्रलयावर ते कळत नाही. शिवाय त्यात सत्यघटनेची आकडेवारी आल्यामुळे हा सिनेमा डाॅक्युड्रामा होऊ लागतो. दिग्दर्शक म्हणून हा महापूर दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला होऊच शकतो. पण त्यासाठी त्याची प्रेमकथा अधिक चित्तवेधक आणि उत्कट असायला हवी होती असं वाटून जातं.
कलाकारांचा अभिनय, छायांकन, व्हीएफएक्स, संगीत या सगळ्या पातळ्यांवर चित्रपट नेटका असल्यामुळे तो खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो खरा. पण आणखी काहीतरी सिनेमात असायला हवं होतं, असं वाटत राहतंं. या सगळ्यात भाव खाऊन जाते ती सारा. तिचं इंडस्ट्रीत येणं आश्वासक आहे.
एकूणात, या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये आपण देतो आहोत दोन स्टार्स.

आणखी वाचा























