एक्स्प्लोर
निरुपा रॉय यांच्या मोठ्या मुलाचा धाकट्या भावावर हल्ला?
योगेश यांनी आपल्या भागात घुसून खिडक्या तोडल्या, कुटुंबाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली, असा आरोप किरण यांनी केला आहे.

मुंबई : मोठ्या पडद्यावरील आदर्श आई अर्थात दिवंगत अभिनेत्री निरुपा रॉय यांच्या दोन मुलांमध्येच मालमत्तेवरुन वाद रंगल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही, तर आपल्या मोठ्या भावाने आपल्यावर हल्ला केला, असा आरोप निरुपा रॉय यांच्या धाकट्या मुलाने केला आहे. 'दीवार' चित्रपटात शशी कपूरने अभिमानाने 'मेरे पास माँ है' असं सांगून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटासह बॉलिवूडमध्ये साठ-सत्तरच्या दशकात असंख्य चित्रपटांमध्ये निरुपा रॉय यांनी आईची भूमिका जिवंत केली होती. मात्र या आदर्श आईची 'रिअल लाईफ'मधली लेकरं आपापसात भांडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार निरुपा रॉय यांचे धाकटे पुत्र किरण रॉय यांनी मुंबईतील मलबार हिल पोलिस स्थानकात सोमवारी रात्री 11 वाजता फोन केला आणि आपला मोठा भाऊ योगेश रॉय यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा केला. नेपियन सी रोडवरील घरात योगेश आणि किरण आपापल्या कुटुंबासह वेगवेगळ्या भागात राहतात. मात्र योगेश यांनी आपल्या भागात घुसून खिडक्या तोडल्या, कुटुंबाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली, असा आरोप किरण यांनी केला आहे. योगेश यांनी आपल्या धाकट्या भावाचे आरोप फेटाळले आहेत. किरण यांनीच आपल्याला मेसेज करुन टोमणे हाणले आणि प्रक्षुब्ध करण्याचा प्रयत्न केला, असा दावा योगेश रॉय यांनी केला आहे. मी विजेचं बील भरत असल्यामुळे तो मुद्दाम सर्व दिवे सुरु ठेवतो, तिन्ही एसी ऑन ठेवतो, असं ते म्हणाले. आपण धाकट्या भावावर हल्लाही केला नाही, किंवा त्याच्या पत्नीवर हातही उचलला नाही, असं योगेश म्हणतात. दोन्ही भावांमध्ये लहानसं भांडण झालं होतं आणि अदखलपात्र तक्रार मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती मलबार हिल पोलिसांनी दिली. निरुपा रॉय यांच्या नावे असलेल्या अपार्टमेंटवरुन गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरु आहे. 1963 मध्ये दहा लाखांपेक्षा कमी किमतीत निरुपा यांनी एम्बसी अपार्टमेंट विकत घेतली होती. 3 हजार फुटांवर चार बेडरुमची ही अपार्टमेंट पसरली असून 8 हजार फूटांची बाग त्याला लागून आहे. दोन बेडरुम्समध्ये मोठा मुलगा आपल्या कुटुंबासह राहतो, तर उर्वरित दोन बेडरुममध्ये धाकटा मुलगा आणि त्याचं कुटुंब. 2004 मध्ये निरुपा रॉय यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती कमल रॉय या मालमत्तेचे मालक झाले. नोव्हेंबर 2015 मध्ये कमल यांच्या मृत्यूनंतर भावांमधील वाद विकोपाला गेला. 2016 मध्ये किरण यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेऊन आपणच खरे वारस असल्याचा दावा केला. वडिलांनी मृत्यूपत्रात एम्बसी अपार्टमेंट आपल्या नावे करण्याचं लिहिलं आहे, असं ते म्हणाले.
आणखी वाचा























