(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गीतकार जावेद अख्तर आर्यन खानच्या पाठीशी, ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूडला टार्गेट केलं जात असल्याची टीका
शाहरुख आणि आर्यन खानच्या मदतीला गीतकार जावेद अख्तर धावून आले आहेत. बॉलिवूडला टार्गेट केलं जात असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.
Mumbai Cruise Drugs Case : मुंबईतील क्रुझ ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबईतील आर्थर रोडवरील तुरुंगात कैद आहे. दरम्यान संवाद लेखक, गीतकार जावेद अख्तर हे शाहरुख आणि आर्यनच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. त्यांनी शाहरुख आणि आर्यन खानचे नाव न घेता बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांवर निशाणा साधला. मुंबईत चेंजमेकर्स या पुस्तकाचं प्रकाशन जावेद अख्तर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जावेद अख्तर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शाहरुख आणि आर्यन खानला पाठिंबा देत जावेद अख्तर म्हणाले
बॉलिवूडच्या कलाकारांवर निशाणा साधत जावेद अख्तर म्हणाले, मी हेच सांगू शकतो की, एका पोर्टवर एक बिलियन डॉलरची कोकेन मिळते आणि एका ठिकाणावरील क्रुझवर 1200 लोकं सापडतात आणि 1.30 लाख किंमतीची चरस पकडली जाते. त्याची जागतिक बातमी बनविण्यात येते. बिलियन डॉलरच्या कोकेनची मी कोणतीच ब्रेकिंग बातमी ऐकलेली नाही. ही बातमी वर्तमानपत्राच्या पाचव्या किंवा सहाव्या पानावर येत असते. मग असे म्हटले जाते की, पोर्टवर जहाज आणले जाणार नाही. अरे जे मिळाले आहे त्याविषयी तर आधी बोला
बॉलिवूडला उच्च स्थानी असल्याची किंमत मोजवी लागणार आहे - अख्तर
जावेद अख्तर पुढे म्हणाले,बॉलिवूडला उच्च स्थानी असल्याची किंमत मोजवी लागणार आहे. अल्पसंख्याकांविरोधात होणारा अन्याय बघून मी चिंता व्यक्त करतो. अशा घटना बांगलादेशात जास्त घडतात. हसीना शेखची ओळख एक उदारवादी नेता म्हणून झाली होती. अशा घटना भारतात होऊदेत किंवा भारताबाहेर. ही एक चिंतेची बाब आहे.
आर्यन खानचे समुपदेशन
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यन खानचे समुपदेशन केले. यादरम्यान आर्यन समीर वानखेडेंना म्हणाला, की "तुरूंगातून सुटका झाल्यानंतर तो गरिबांना मदत करणार आहे". आर्यन पुढे म्हणाला, एक दिवस सर्वांना अभिमान वाटेल असे काम करुन दाखवेन.
आर्यन खानचा जामीन
20 ऑक्टोबरला होणाऱ्या सुणावणीत आर्यन खानला जामीन मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्यन खानतर्फे अमित देसाई, सतीश मानशिंदे तर एनसीबीकडून अनिल सिंह दाखले देणार आहेत. आर्यनचा ट्रायल नंबर N956 आहे. तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या नंबरच्या नावाने ओळखले जाते. त्याचमुळे आर्यनला त्याचा कैदी नंबर मिळाला आहे. आर्यन खान तुरुंगात वैतागलेला दिसून येतो. त्याला तुरुंगात मिळणारे जेवण आवडत नसल्याने तो जेवतदेखील नाही. तुरुंगात बाहेरचे जेवण आणण्याची परवानगी नाही. आर्यन तुरुंगात त्याचे घरचे कपडेच घालतो.