धर्मेंद्रशी लग्न होण्यापूर्वी भुताटकी बंगल्यात राहायच्या हेमा मालिनी, रात्री अभिनेत्रीबरोबर घडायच्या विचित्र घटना, शेअर केला थरार
झगमगाटात जगणाऱ्या बॉलिवूडच्या पडद्यामागे त्यांच्या आयुष्यात असे काही अनुभव आले, जे आजही अंगावर काटा आणतात.

Hema Malini: हेमा मालिनी यांचे नाव हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत अग्रक्रमाने घेतले जाते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगणार आहोत, जो एका भुताटकी बंगल्याशी जोडलेला आहे. हेमा मालिनी या बॉलिवूडच्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. चित्रपट कारकिर्दीबरोबरच त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत. राजकारणात भारतीय जनता पार्टीकडून मथुरा मतदारसंघाच्या खासदार झाल्यानंतर त्यांनी अभिनयापासून काहीसे अंतर ठेवले असले, तरी त्यांच्या सुवर्णकाळातील अभिनयाबाबतच्या चर्चा आजही थांबत नाहीत. झगमगाटात जगणाऱ्या बॉलिवूडच्या पडद्यामागे त्यांच्या आयुष्यात असे काही अनुभव आले, जे आजही अंगावर काटा आणतात.
हा किस्सा आहे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातला. तेव्हा त्या मुंबईत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होत्या. धर्मेंद्र यांच्याशी लग्नही झालेले नव्हते आणि मुंबईत स्थिरावण्यासाठी त्या जे मिळेल तिथे राहायला तयार होत्या. अशाच वेळी त्या जुहू परिसरातील एका मोठ्या बंगल्यात राहायला गेल्या.
या बंगल्यात त्यांना फार विचित्र अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलंय. त्या बंगल्यात हेमा मालिनी यांनी बराच काळ घालवला होता. हा संपूर्ण प्रकार सविस्तर जाणून घेऊया.
भुताटकी बंगल्यात राहत होती ड्रीम गर्ल
तो काळ असा होता, जेव्हा हेमा मालिनी हिंदी सिनेमात अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत होत्या. त्या वेळी अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी त्यांचे लग्न झालेले नव्हते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत स्थायिक होण्यासाठी हेमांना खूप संघर्ष करावा लागला. याच काळात त्या एका हॉन्टेड घरात राहायला गेल्या होत्या, जिथे दररोज रात्री त्यांच्या सोबत काही ना काही विचित्र घटना घडायच्या.खरं तर, चित्रपट पत्रकार राम कमल मुखर्जी यांनी हेमा मालिनी यांच्यावर ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ (Hema Malini: Beyond The Dream Girl) नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात हेमा आणि त्या भुताटकी घराबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
हेमा यांनी स्वतः सांगितले होते, “मी मुंबईतील जुहू भागात एका मोठ्या घरात राहायला गेले होते. पण ते घर भुताटकी आहे, याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती. दररोज रात्री माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडायचे. मला शांत झोपही लागत नव्हती. एका रात्री तर मला असे वाटले की कुणीतरी माझा गळा दाबत आहे आणि मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. नंतर काही काळासाठी मी माझ्या आईच्या घरी राहायला गेले. पण त्यानंतरही त्या घरात घडणाऱ्या घटना थांबल्या नाहीत आणि शेवटी मला ते घर कायमचे सोडावे लागले.”
धर्मेंद्र यांच्या निधनाने हेमा मालिनीवर दुःखाचा डोंगर
हेमा मालिनी यांचे पती आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांचे गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यानंतरपासून आजपर्यंत हेमा सोशल मीडियावर पतीच्या आठवणी काढत भावूक होताना दिसल्या आहेत. ‘शोले’मधील बसंती आजही आपल्या वीरूच्या जाण्याचे दुःख विसरू शकलेली नाही.























