Gorkha सिनेमाच्या पोस्टरमध्ये Akshay Kumar कडून झाली मोठी चूक, एक्स गोरखा ऑफिसरने ट्वीट करत दाखवली चूक
Gorkha : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने काल 'गोरखा' सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टर खूपच दमदार आहे. चित्रपटाआधी प्रदर्शित झालेल्या पहिला लूकमध्ये अक्षयच्या हातात खुखरी आहे.
Akshay Kumar made a big mistake in the poster of Gorkha : अक्षय कुमार (Akshay Kumar) ने नुकतेच त्याच्या आगामी 'गोरखा' (Gorkha)सिनेमाची माहिती दिली आहे. चित्रपटातील मेजर जनरल इयान कार्डोझोची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे. पोस्टरमध्ये अक्षयच्या हातात खुखरी दिसून येत आहे. चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांना आवडले होते. पण, पोस्टरमध्ये अक्षय कुमारकडून एक मोठी चूक झाली आहे. त्याची चूक एक्स गोरखा ऑफिसरने पकडली आहे. त्यांनी ट्वीट करत चूक लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर अक्षयने ती चूक सुधारली आहे.
अक्षय कुमार कडून झाली 'ही' चूक
अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. त्यात त्याच्या हातात गोरखांची ओळख मानली जाणारी खुकरी होती. पण त्याची खुकरी हातात पकडण्याची पद्धत चुकली होती. तीच चूक एक्स गोरखा ऑफिसरच्या लक्षात आली आहे. त्यानंतर त्यांनी अक्षय कुमारला टॅग करत ट्वीट केले आहे आणि लिहिले,"प्रिय अक्षय कुमारजी एक्स गोरखा ऑफिसरच्या नात्याने हा चित्रपट बनविल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. पण कृपा करुन खुकरी नीट पकडा. खुखरीचा धारवाला भाग दुसऱ्या बाजूला पकडा. ही तलवार नाही. तसेच त्यांनी खुकरीचा योग्य फोटोदेखील शेअर केला आहे".
त्याच ट्वीटवर अक्षय कुमारने रिप्लाय देत लिहिले, "मेजर जॉली ही गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटाची शूटिंग करताना या गोष्टीची काळजी घेतली जाईल. गोरखा चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. अक्षय कुमारचे लवकरच सूर्यवंशी आणि अतरंगी रे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर गोरखा सिनेमात दिसणार आहे.
चित्रपटाची माहिती देताना मेजर जनरल इयान कार्डोझो म्हणाले, "1971 साली झालेल्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने युद्धाची गोष्ट शेअर करताना मला अभिमान वाटतो आहे. हा चित्रपट भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे. मी आनंद आणि अक्षयसोबत हा चित्रपट करतो आहे, याचा मला आनंद आहे". चित्रपटातील मेजर जनरल इयान कार्डोझोची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे. याआधी देखील अक्षयने अनेक देशभक्तीपर चित्रपट केलेले आहेत. अक्षयने चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यासोबत चित्रपटाचे पोस्टरदेखील जाहीर केले आहे. याआधी अक्षयचे रुस्तम, बेबी, एयरलिफ्ट, बेलबॉटम, केसरी असे देशभक्तीपर चित्रपट केलेले आहेत.
अक्षयचा 'सूर्यवंशी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेता (Akshay Kumar) चा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'ची (Sooryavanshi) प्रतिक्षा संपली आहे. लवकरच सिनेमागृहात चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने (Rohit Shetty) केले आहे. चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंहने चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जाहीख केली आहे. हा चित्रपट दिवाळीत 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.