अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विवाहबद्ध! लग्न समारंभाचा खर्च कोविड मदतनिधीला देणार
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर जुलै महिन्यात लग्न करणार होते. मात्र दोन महिने आधीत त्यांनी लग्न केले आहे. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

मुंबई : कोरोना काळात सगळ्याच समारंभांवर मर्यादा आल्या आहेत. लग्नासारखा समारंभ करायचा विचार जरी आला तरी पै-पाहुण्यांना कधी आणि कसं बोलावणार या काळजीने विवाहसमारंभ पुढे ढकलले जातायत. अशात मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मात्र प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेऊन सर्वांना सुखद धक्का दिला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल जेवढं सोनालीचं कौतुक तेवढंच कुणालचंही.
सोनालीने सोशल मीडियावरून आपण विवाहबद्ध झाल्याची सुखद वार्ता सर्वांना दिली. हा अत्यंत घरगुती विवाहसोहळा दुबईत झाला. प्राप्त परिस्थिती समोर आल्यानंतर सोनाली आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर यांनी हा निर्णय घेतला. 7 मे रोजी दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. अगदीच मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा निर्णय़ घेण्यात आला. फेसबुकवरून सोनालीने ही सुखद वार्ता दिली.

खरंतर सोनाली आणि कुणाल यांचं लग्न जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणार होतं. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे लग्न जुलैमध्ये ठरलं. त्या लग्नाची तयारी करण्यासाठी सोनाली चित्रिकरण संपवून मार्चमध्ये दुबईला गेली आणि लॉकडाऊनमुळे तिथेच अडकली. कुणाल दुबईत होताच. पुढे तोवर वाढत्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका ओळखून इंग्लंडने भारताला आपल्या देशाचे दरवाजे काही काळासाठी बंद केले. ही स्थिती जुलैपर्यंत बदलणार नाही हे लक्षात आल्यानंतर एकूण सध्या कोरोनाचं असलेलं सावट, नातेवाईकांच्या प्रवासामुळे येणारी जबाबदारी हे पाहता लग्न समारंभच रद्द करण्याचा निर्णय सोनाली आणि कुणालने घेतला आणि लग्नाची तारीख अलिकडे आणायची ठरली आणि 7 मे चा मुहूर्त साधण्यात आला.

या लग्नावेळी कुणालचे आईवडील इंग्लंडला होते. तर सोनालीचे इकडे भारतात. या दोन्ही बाजूच्या पालकांनी ऑनलाईन या लग्नात सहभाग घेतला. यानिमित्ताने लग्नासाठी होणारा खर्चही टाळण्यात आला आहे. ही रक्कम कोविड विरुद्धच्या मदतनिधीसाठी देण्याचा निश्चयही या दोघांनी केला आहे.
कुणाल हा सीए आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर इंडस्ट्रीतल्या बऱ्याच कलाकारांनी या दोघांना केळवणही केलं होतं. पुढे कुणाल दुबईला गेला. सोनाली चित्रिकरणात व्यग्र झाली. चित्रिकरण संपवून सोनाली मार्चमध्ये दुबईला गेली ती जुलैमध्ये होणाऱ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी. त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहून दोघांनी लग्न अलिकडे आणण्याचा निर्णय घेतला. आता हे नवदाम्पत्य काही काळ दुबईतच असेल.























