'छावा फूट पाडणारा सिनेमा', या वक्तव्यावरून ए.आर रहमान टीकेचे धनी; मुलींनी ट्रोलर्सना खडेबोल सुनावलं
Music Legend AR Rahman Receives Support From Family and Fans: ए. आर. रहमान छावा चित्रपटाबाबत विधानामुळे ट्रोलिंगला सामोरे गेले. टीकेनंतर रहमान यांनी वक्तव्य स्पष्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली.

Music Legend AR Rahman Receives Support From Family and Fans: गेल्या काही दिवसांपासून ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर रहमान चर्चेत आहेत. त्यांनी अलिकडेच दोन मुद्द्यांवर भाष्य केले होते. ज्यामुळे ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते. ए. आर रहमान यांनी, छावा हा चित्रपट फूट पाडणारा सिनेमा होता, असं म्हटलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं. टीकेचे धनी झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. परंतु, अजूनही त्यांच्यावर ट्रोलर्सकडून टीका केली जात आहे. याच ट्रोलिंगला कंटाळून ए. आर रहमान यांच्या मुलींनी पुढाकार घेत या वादात उडी घेतली. तसेच वडिलांच्या (ए. आर रहमान) समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली. ए. आर रहमान यांच्या मुली खतिजा आणि रहिमा यांनी सोशल मीडियावर संगीतकार कैलास मेनन यांनी त्यांच्या वडिलांसाठी लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?
"ए. आर रहमान यांनी केवळ आपल्या मनातील भावना व्यक्त केली. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेबद्दल त्यांना दोष देणारे लोक एक मूलभूत गोष्ट विसरत आहेत. त्यांनी फक्त आपले अनुभव आणि विचार मांडले आहेत. हे मुळात त्यांचे हक्क आहे. तुम्ही त्यांच्या मतांशी असहमत असू शकतात. पण त्यांना आपले अनुभव व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नाकारता येत नाही. मात्र, नंतर घडलेले काही प्रसंग मतभेदांच्या पलीकडे जाऊन चारित्र्यहननापर्यंत पोहोचले आहेत. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित कलाकारांचा अनादर करणे, त्यांच्या श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणे, त्यांच्या कामाची थट्टा करणे , तसेच त्यांच्या आयुष्यातील अनुभवांना व्हिक्टिम कार्ड म्हणून ठरवणे ही साधी टीका नाही. ही टीका म्हणजे द्वेषपूर्ण आणि वैमनस्यपूर्ण टिप्पणी आहे", असं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
"हा काही सामान्य आवाज नाही. ही एक अशी व्यक्ती आहे, ज्यांनी भारतीय संगीताला जगभरात पोहोचवलं आहे. त्यांनी आपल्या कामाद्वारे अनेक पिढ्या घडवल्या आहेत. एखाद्या कलाकाराने आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं म्हणून तमिळ संस्कृती, भारतीय चित्रपट आणि जागतिक संगीतामधील योगदान त्यांचं दशकभराचं योगदान संपत नाही. तुम्ही त्यांच्या वक्तव्याशी असहमत असू शकतात. हे सर्व ठीक आहे. परंतु, सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान करणं, त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं चुकीचं आहे", असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट खतिजा आणि रहिमा यांनी देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.
























