(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास
विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे वजनदार आणि समंजस नेते आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी व्यक्त केला आहे.
पंढरपूर : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुलगा रणजीतसिंह मोहिते पाटलांप्रमाणे तेही पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे वजनदार आणि समंजस नेते आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी व्यक्त केला आहे.
नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणे ही ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी असते आणि विजयसिंह मोहिते पाटील कार्यकर्त्यांची समजूत काढून पक्षातच राहतील, असं तटकरे यांनी सांगितले. आमच्या सारख्या अनेक तरुण नेत्यांनी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील रणजीतचीही समजूत काढतील, असं सुनील तटकरेंनी म्हटलं.
विजयसिंह मोहिते पाटलांवर अन्याय होत आहे का याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही. मी सध्या रायगडाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने मोहिते पाटील यांच्या निर्णयाबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचेही तटकरे यानी सांगितले.
रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार
राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा रणजितसिंह यांनी अकलूजमध्ये केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा का? असा प्रश्न रणजितसिंह यांनी विचारताच हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने घोषणा देत भाजप प्रवेश करण्याच्या निर्णयाला समर्थन दर्शवलं.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादीला मोठा धक्का, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार
बिनधास्त भाजपमध्ये जा, आम्ही पाठीशी आहोत, मोहिते-पाटील पितापुत्रांना कार्यकर्त्यांची ग्वाही