एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"शिवसेनेनं परतीचे दोर कापले आहेत"-शिवसेनेवरील टीकेला संजय राऊतांचं 'रोखठोक' उत्तर
"शिवसेनेने परतीचे दोर कापले आहेत, आता मुख्यमंत्री पद मिळवल्याशिवाय थांबणार नाही", या शब्दात शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शिवसेनेवरील टीका-टोमण्यांना उत्तर दिलं. 'एबीपी माझा.इन'च्या 'यू-ट्यूब' चॅनलवरील एक्सक्लुझिव्ह गप्पांमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं. मुख्यमंत्री पदासह सत्तेच्या समसमान वाटपावरून सध्या शिवसेना अडून बसली आहे. मात्र, शिवसेनेचं हे दबावतंत्र आहे आणि लवकरच सेना भाजपनं दिलेली ऑफर स्वीकारेल, अशी टीका होत होती. मात्र, राऊतांनी हे आक्षेप फेटाळून लावले.
मुंबई: "आता परतीचे दोर कापलेत, आता आर-पार...तसं नसतं तर पहिल्या २४ तासांतच गोष्टी सहज झाल्या असत्या. चार खाती, केंद्रात मंत्रिपदं, विधान परिषद वगैरेच्या पलिकडे आता आम्ही गेलो आहोत. जे ठरलंय तेच आम्ही मागत आहोत. मात्र, असं काही ठरलंच नसल्याचं जाहीर म्हणणं, हे महाराष्ट्राला पटणारं नाही", अशा शब्दात शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेनेबद्दलच्या 'मांडवली', 'सेटलमेंट'च्या वावड्यांना उडवून लावलं. 'एबीपी माझा.इन'च्या 'यू-ट्यूब' चॅनेलवरील लाईव्ह गप्पांमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली. उपमुख्यमंत्रिपद, १६ खाती वगैरे प्रस्ताव भाजपकडून आल्याच्या बातम्यांनाही राऊत यांनी स्पष्टपणे फेटाळून लावलं. राऊत म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्रिपदाची चर्चा करतोय इतर खात्यांची नाही...ज्याला तुम्ही 'मलाईदार' खाती म्हणता; ज्यांना ती मलई खायची आहे, त्यांनी ती खात राहावी, इतकी वर्ष ती कुणी खाल्ली ते आम्हाला माहित नाही. मुख्यमंत्रिपद हा आमचा हक्का आहे. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, मुख्यमंत्रिपदी मी शिवसैनिक बसवेन, मला वाटतं हीच ती वेळ आहे.
कमी जागा जिंकल्या असतानाही शिवसेना थेट मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाट्यासाठी अडून का बसली आहे? असाही प्रश्न विचारला जात होता. त्यासाठी, शिवसेना आणि भाजप युतीच्या ९०पासूनच्या निवडणुकांचे दाखलेही दिले गेले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, सत्तेचं वाटप हे निवडून आलेल्या जागांवर नाही तर निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षात काय ठरलं होतं, यावर ठरतं. आमच्यातही सर्वकाही निवडणुकीपूर्वी ठरलं होतं. भाजपला जर १०५ जागा मिळाल्या, तर त्यात शिवसेनेचंही योगदान आहे आणि आम्हाला मिळालेल्या ५६ जागांमध्ये भाजपचं योगदान आहे. जर, हे मान्य नव्हतं तर (भाजपनं) जायचं होतं लढायला, आम्हीही गेलो असतो. तुम्ही आम्हाला कशाला फशी पाडलं युतीसाठी? आम्हाला गरज नसताना आम्ही युती केलेली आहे.
भाजपकडून शिवसेनेबद्दल आक्रमक भाषा वापरली जात नसताना, शिवसेनेतून फक्त संजय राऊतच आक्रमक भाषा वापरताहेत, यामुळे भाजप-सेनेतील 'पीस प्रोसेस'ला धक्का बसतोय का? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, ही 'पीस प्रोसेस' नसून हक्काची लढाई आहे. भाजपचे इतर नेते बोलत नाहीत कारण त्यांनाही माहित आहे की, शिवसेनेची बाजू न्यायाची आहे. जे ठरलंय ते (शिवसेनेला) मिळायला पाहिजे. यातून आलेल्या 'गिल्ट'मुळे ते बोलायला तयार नाहीत.
भाजपला बहुमत सिद्ध करता न आल्यास ६३ आमदारांची शिवसेना १४४ जागांचं अंकगणित कसं जमवणार? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचं आणि बेरजेचंही राजकारण होतं. "...मात्र, बेरजेला महत्व आहे", अशा सूचक शब्दात त्यांनी भावी जुळवाजुळवीची चुणूक दाखवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement