पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
Prakash Ambedkar on Sharad Pawar: शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट कृती करतात हे त्यांच्याबद्दल माझं मापदंड अगदी तंतोतंत खरं ठरल्याचा उपरोधिक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला.

Prakash Ambedkar on Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुकींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र करण्याची किमया केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विलीन करून सत्तेत सामील होण्याची चर्चा आणखी रंगली आहे. इतकेच नव्हे तर केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री होतील आणि राज्यांमध्ये अजित पवार यांना एकाधिकार दिले जातील आणि शरद पवार खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सक्रीय राजकारणापासून दूर होतील अशी चर्चाही राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.
दरम्यान, काल झालेल्या बारामतीच्या कार्यक्रमामध्ये काका पुतण्या आणि सुप्रिया सुळे यांची जवळीक नव्याने दिसून आली. या सर्व पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा खोचक टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काका आणि पुतण्या एक आले म्हणजे त्यांचं विलीनीकरण झालं आहे. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे पहिले पाऊल टाकलं असल्याचं भाकित वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे.
तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये
शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट कृती करतात हे त्यांच्याबद्दल माझं मापदंड अगदी तंतोतंत खरं ठरल्याचा उपरोधिक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला. तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, असे म्हणत असा खोचक टोलाही आंबेडकर यांनी लगावला. ते म्हणाले की काँग्रेसने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोटामध्ये राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे ज्या ज्या पक्षांसोबत युती करणार असतील त्यांच्यासोबत काँग्रेसने जाऊ नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. हे काँग्रेसने पाळलं नाही, तर महाराष्ट्राप्रमाणे देशभरात त्यांचं अस्तित्व कमी होईल, असा इशारा आंबेडकरांनी काँग्रेसला दिला मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. इतर महापालिकांमध्ये भाजप वगळून इतर पक्षांशी आघाडी करण्याचे सुरू असल्याचे ते म्हणाले. ज्या ठिकाणी बोलणी फिस्कटतील त्याठिकाणी आम्ही स्वबळावर लढू, असं आंबेडकरांनी जाहीर केलं.
इतर महत्वाच्या बातम्या




















