Manoj Jarange: राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात, येड्यांना कळतं, तुम्ही तर शहाणे, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil On Raj Thackeray: राज ठाकरेंनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange On Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लढवणार अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याची भूमिका जाहीर केली. यावर राज ठाकरे यांनी तुम्ही आरक्षण कसं मिळवून देणार?, येवढं मला सांगा असं सवाल उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात. त्यामुळे त्यांचा मेळ लागत नाही. आम्ही तुम्हाला विरोधक मानत नाही, मग तु्म्ही पण बोलू नका. मी तुम्हाला हे समजावून सांगतोय, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांचा खूप मोठा वर्ग तुम्हाला मानतो. तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे. तुम्ही नाराजी ओढावून घेऊन नका. तुम्ही आमच्या लफड्यात पडू नका. मराठा समाजाचं कसं अस्तित्व वाढवायचं हे मला माहिती आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
2 करोड लोकांना आरक्षण मिळालं; मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
तुम्ही म्हणताय आरक्षण कसं देणार?, पण 2 करोड लोकांना आरक्षण मिळालं आहे. राज्यभरात 57 लाख नोंदी सापडल्या. हे तुम्ही का सांगत नाहीय?, यापुढे देखील असेच आरक्षण मिळणार हे येड्या लोकांना पण कळते, तुम्ही तर शहाणे आहात. आंदोलन करणारा माणूस शहाणा असतो. तुम्ही टोल बंद करता, आंदोलन करता, म्हणजे तुम्ही शहाणे माणूस आहात. त्यामुळे तुम्ही नाराजी अंगावर ओढावून घेऊ नका, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
मनोज जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्र राज्यापुरता नसून देशभराचा विषय आहे. प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या जातीचे प्रश्न पुढे येतील...हे होणार नाही. आरक्षण देणाऱ्यांना विचारा कसे देणार...ते देऊ शकत नाही...कोणतेही राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही...जी गोष्ट घडू शकत नाहीत... भेटू शकत नाहीत त्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत, असं राज ठाकरेंनी सांगितले.