(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिजोरीवर डाका टाकायचा होता म्हणून नोटबंदी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर गंभीर आरोप
नरेंद्र मोदींनी देशाला खोटं बोलून लुटलं आहे. त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांना जनता आता पंतप्रधान करणार नाही, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केला.
वसई-विरार : भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे डाकूचे सरकार आहे. देशाच्या तिजोरीवर डाका टाकायचा होता म्हणून त्यांनी नोटबंदी केली, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांची जाहीर सभा आज नालासोपारातील सेंट्रल पार्क येथे भरवण्यात आली होती, त्याठिकाणी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला गृहीत धरु नये. मोदीजी देशाचे राजे नाहीत, तर मतदार येथील राजा आहे, याची आठवण प्रकाश आंबेडकरांनी करुन दिली. नरेंद्र मोदींनी देशाला खोटं बोलून लुटलं आहे. त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांना जनता आता पंतप्रधान करणार नाही, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केला.पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकमुळे जागतिक पातळीवर देशाची मान खाली गेली आहे. नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा जगासमोर आला आहे. 125 कोटी लोकांचा प्रतिनिधी, देशाचा पंतप्रधान खोटारडा आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
भाजप-शिवसेना सरकार डाकूचे सरकार आहे. या सरकारला तिजोरीवर डाका घालायचा होता म्हणून नोटबंदी केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. नोटा बदलून देतो असं सांगून मोदींनी काळ्या अर्थव्यवस्थेला लुटलं असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.
VIDEO | नरेंद्र मोदी दहशतवादी संघटनेचे सदस्य : प्रकाश आंबेडकर | कोल्हापूर