Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता; छगन भुजबळांच्या दाव्याने नवे वादळ
Chhagan Bhujbal: मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या, असंही छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. ईडीच्या भयानेच सरकारमध्ये सहभागी झाल्याचं छगन भुजबळ यांनी पुस्तकात कथन केलं आहे. तसेच सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असा दावाही या पुस्तकात केला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता, असं छगन भुजबळ यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. तसेच मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
अजित पवारांना घाम फुटला-
अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते. या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता, अशी माहिती राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दिली. यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती. यावर तोडगा कसा काढायचा यावर खल झाला. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या, असं पुस्तकात कथन करण्यात आले आहे.
छगन भुजबळांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण-
दैनिक लोकसत्तामध्ये छापून आलेल्या वृत्तानंतर छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांनी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. अनेक वृत्तवाहिन्यांवर छगन भुजबळ यांनी पुस्तक लिहिले असा उल्लेख आहे. परंतु असे कोणतेही पुस्तक छगन भुजबळ यांनी लिहिले नाही. याबाबत सविस्तर खुलासा स्वतः छगन भुजबळ हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.